बर्मिंघम : वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडच्या बॉलिंगसमोर ऑस्ट्रेलियाची अवस्था वाईट झाली. कांगारुंच्या सुरुवातीच्या ३ विकेट फक्त १५ रनवर गेल्या. यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ऍलेक्स कॅरी यांनी डाव सावरला. यावेळी ऍलेक्स कॅरीला लागलेल्या बाऊन्सरमुळे त्याचं हेल्मेट उडालं. एवढंच नाही तर कॅरीच्या हनुवटीतूनही रक्त येऊ लागलं. तरीही ऍलेक्स कॅरी मैदानातून गेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोफ्रा आर्चरने ८६ मिल प्रती तासाच्या वेगाने टाकलेला भेदक बाऊन्सर ऍलेक्स कॅरीच्या हेल्मेटला लागला. यामुळे कॅरीच्या हेल्मेटला असलेली जाळीही तुटली. कॅरीच्या हनुवटीतून मैदानात रक्त पडायला लागलं. उडालेलं हेल्मेट स्टम्पवर जाऊन पडणारच होतं, तेव्हा कॅरीने चपळता दाखवली आणि हेल्मेट पकडलं. हेल्मेट स्टम्पला लागलं असतं, तर कॅरी आऊट झाला असता. पण दुखापत झालेली असतानाही कॅरीने आपली विकेट वाचवली.



दुखापत झाल्यानंतर इंग्लंडचे खेळाडू लगेच ऍलेक्स कॅरीजवळ आले. इंग्लंडच्या खेळाडूंनी कॅरीला सहारा दिला. ऑस्ट्रेलियाची मेडिकल टीम आणि डॉक्टर लगेच मैदानात आले आणि त्यांनी कॅरीला औषध दिलं. डॉक्टरांनी कॅरीला मान आणि चेहऱ्याचा व्यायाम करायला लावला. तसंच कॅरीला प्लास्टरही बांधलं.



७० बॉलमध्ये ४६ रन करून कॅरी आऊट झाला. ऍलेक्स कॅरी आणि स्टीव्ह स्मिथ यांनी १०३ रनची पार्टनरशीप करून ऑस्ट्रेलियाला संकटातून बाहेर आणलं. कॅरी आऊट झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोअर ११७ पर्यंत पोहोचला होता.