World Cup 2019 : वादानंतरही `झिंग` बेल्स बदलायला आयसीसीचा नकार
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये झिंग बेल्समुळे वाद निर्माण झाला आहे.
लंडन : यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये झिंग बेल्समुळे वाद निर्माण झाला आहे. मॅचमध्ये अनेक वेळा स्टम्पला बॉल लागल्यानंतरही बेल्स उडल्या नसल्याचं समोर आलं. यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच यांनी या एलईडी बेल्सची तक्रार केली. तरीही आयसीसीने या बेल्स बदलायला नकार दिला आहे. एलईडी बेल्सला बॉल लागला तर प्रकाश पडतो, यामुळे थर्ड अंपायरला निर्णय घेणं सोप जातं. पण अनेकवेळा या बेल्स पडतच नाहीत. बेल्स न पडल्यामुळे बॅट्समनला आऊट दिलं जात नाही.
स्काय स्पोर्ट्सनं आयसीसीच्या हवाल्याने सांगितलं, 'आम्ही स्पर्धेदरम्यान काहीही बदलू शकत नाही, कारण यामुळे स्पर्धेशी तडजोड होईल. सगळ्या १० टीमसाठी ४८ मॅचसाठी उपकरणं समान आहेत.'
या वर्ल्ड कपमध्ये जवळपास १० वेळा स्टम्पला बॉल लागल्यानंतरही बेल्स पडली नाही. बेल्सच्या आतमध्ये एलईडी लाईट्ससाठी तारा लावण्यात आल्या आहेत, या कारणाने बेल्सचं वजन वाढलं आहे, असं बोललं जात आहे.
'मागच्या ४ वर्षांपासून स्टम्पला बदलण्यात आले नाहीत. २०१५ वर्ल्ड कप आणि अनेक स्थानिक स्पर्धांमध्ये याचा वापर केला जात आहे. एक हजारपेक्षा जास्त मॅचमध्ये या स्टम्पचा वापर केला आहे,' असं आयसीसीने सांगितलं.
रविवारी भारताविरुद्धच्या मॅचमध्ये जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगवर ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला जीवनदान मिळालं. बुमराहने टाकलेला बॉल स्टम्पला लागला, पण बेल्स न पडल्यामुळे वॉर्नरला आऊट देण्यात आलं नाही.
'आज आम्हाला याचा फायदा झाला असला तरी अनेकवेळा हे अनुचित वाटतं. वॉर्नरच्या स्टम्पला जलद बॉल लागला. वारंवार होणारी ही गोष्ट दुर्भाग्यपूर्ण आहे. वर्ल्ड कपच्या फायनल किंवा सेमी फायनलमध्ये तुम्हाला हे बघण्याची नक्कीच इच्छा नसेल. एका बॅट्समनला आऊट करण्यासाठी बॉलर आणि फिल्डर रणनिती बनवतात, पण याचा फायदा तुम्हाला मिळत नाही,' असं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच म्हणाला.