मुंबई : २०१९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या अत्यंत रोमांचक अशा फायनलमध्ये इंग्लंडचा विजय झाला. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातली ही मॅच टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर घेण्यात आली. पण सुपर ओव्हरही टाय झाल्यानंतर इंग्लंडने न्यूझीलंडपेक्षा जास्त बाऊंड्री मारल्यामुळे इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं. आयसीसीच्या या नियमावर अनेक क्रिकेटपटू आणि क्रिकेट रसिकांनी टीका केली. सचिन तेंडुलकर यानेही आयसीसीच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कोणत्या टीमने बाऊंड्री जास्त मारल्या याच्यावर मॅचचा निकाल दिला नाही गेला पाहिजे. त्याऐवजी आणखी एक सुपर ओव्हर करून मॅचचा निर्णय यायला पाहिजे होता. वर्ल्ड कप फायनलच नाही, तर प्रत्येक मॅच महत्त्वाची असते. फूटबॉलच्या मॅचला जास्त वेळ दिला जातो,' असं सचिन म्हणाला.


टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मानेही आयसीसीच्या नियमांवर प्रश्न उपस्थित केले होते. तसंच आता नियम बदलण्याची वेळ आली आहे, असं ट्विट रोहितने केलं होतं.


सेमी फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर विराटनेही नॉक आऊट मॅचमध्ये आयपीएलसारखे नियम ठेवणं हा पर्याय असू शकतो, असं वक्तव्य केलं होतं. यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या दोन क्रमांकावर असणाऱ्या टीमना खेळण्याच्या दोन संधी मिळतात.


सचिन तेंडुलकरनेही कोहलीच्या या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे. ज्या टीम टॉप-२ मध्ये असतात त्यांना निश्चितच संधी मिळाली पाहिजे. पहिल्या फेरीत चांगली कामगिरी करणाऱ्या टीमला निश्चितच फायदा झाला पाहिजे, असं मत सचिनने मांडलं.


सेमी फायनलमध्ये धोनीने सातव्या क्रमांकाऐवजी त्याच्या नेहमीच्या पाचव्या क्रमांकावर खेळायला पाहिजे होतं, अशी प्रतिक्रिया सचिनने दिली. त्यावेळी भारत कठीण परिस्थितीमध्ये होता. धोनीकडे अनुभव आहे, त्याला इनिंग बांधायला वेळ पाहिजे. पांड्या सहाव्या क्रमांकावर आणि दिनेश कार्तिक सातव्या क्रमांकावर खेळायला पाहिजे होते, असं सचिन म्हणाला.