मॅनचेस्टर : वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. रोहित शर्माचं शतक तसंच केएल राहुल आणि विराट कोहलीच्या अर्धशतकांमुळे भारताने पाकिस्तानसमोर मोठं आव्हान ठेवलं. भारताच्या या आव्हानाचा पाठलाग करणं पाकिस्तानला जमलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा कर्णधार विराट कोहलीने या मॅचमध्ये ६५ बॉलमध्ये ७७ रनची खेळी केली. कोहलीने ५१ बॉलमध्ये आपलं ५१वं अर्धशतक पूर्ण केलं. याचबरोबर कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये ११ हजार रनचा टप्पा गाठला. वनडेमध्ये सगळ्यात जलद ११ हजार रन करण्याचा विक्रम विराटने केला आहे.


या मॅचमध्ये पाकिस्तानचा बॉलर इमाद वसीम आणि विराट कोहलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. विराट कोहली बॅटिंग करत असताना इमाद वसीम हात जोडत आहे. हात जोडून इमाद वसीम विराटला काहीतरी म्हणल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या मजेशीर कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे.





विराट कोहलीची विकेट गेल्यानंतर गोंधळ पाहायला मिळाला. मोहम्मद आमिरने विराट कोहलीला बाऊन्सर टाकला. विराटने हा बॉल पूल मारण्याचा प्रयत्न केला, पण विकेट कीपर सरफराजने त्याचा कॅच पकडला. मोहम्मद आमिर आणि सरफराजने कॅचसाठी अपील केलं, पण अंपायरने निर्णय देण्याआधीच विराट माघारी परतला. विराट पॅव्हेलियनमध्ये गेल्यावर रिप्ले बघितला असता विराटच्या बॅटला बॉल लागला नव्हता. तसंच अल्ट्रा एजवरही बॉल बॅटला लागल्याचा आवाज आला नाही. हा रिप्ले पाहून ड्रेसिंग रुममध्ये असलेला विराट निराश दिसला.


बॅटला बॉल लागला नसतानाही विराट पॅव्हेलियनमध्ये का निघून गेला? असा प्रश्न चाहत्यांना पडला. पण सौरव गांगुलीने कॉमेंट्री करताना याचं कारण सांगितलं. इंग्लंडमधल्या खेळपट्ट्यांवर बॉल बॅटच्या वरच्या भागाला सतत लागतो. त्यामुळे बॅटचं हॅण्डल हलण्याचे प्रकार होतात. बॅटचं हॅण्डल हलल्यामुळे एक आवाज झाला, त्यामुळे विराटला बॅटला बॉल लागल्याचं वाटलं असेल, अशी शक्यता गांगुलीने बोलून दाखवली.