या ३ टीम वर्ल्ड कप जिंकण्याच्या दावेदार, रिकी पाँटिंगची भविष्यवाणी
३० मेपासून इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.
मेलबर्न : ३० मेपासून इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपविषयी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगनं भविष्यवाणी केली आहे. भारत आणि इंग्लंड या दोन टीम वर्ल्ड कप जिंकण्याच्या प्रबळ दावेदार आहेत, असं रिकी पाँटिंगला वाटतंय. सध्याचा फॉर्म बघात या दोन टीम वर्ल्ड कप जिंकू शकतात. तसंच ऑस्ट्रेलियालाही वर्ल्ड कप जिंकण्याची संधी असल्याचं पाँटिंग म्हणाला. २०१९ सालचा हा वर्ल्ड कप ३० मे ते १४ जुलैदरम्यान होईल. पाचव्या वेळी इंग्लंड वर्ल्ड कपचं आयोजन करणार आहे. ऑस्ट्रेलियानं २०१५ सालचा वर्ल्ड कप जिंकला होता.
रिकी पाँटिंगनं कर्णधार असताना ऑस्ट्रेलियाला दोन वेळा वर्ल्ड कप जिंकवून दिला. पाँटिंग सध्या ऑस्ट्रेलियाच्या टीमचा सहाय्यक प्रशिक्षक आहे. 'स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या निलंबनाचा कालावधी संपल्यावर ऑस्ट्रेलियाची ताकद वाढेल', अशी प्रतिक्रिया रिकी पाँटिंगनं दिली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाची वेबसाईट क्रिकेट डॉट कॉम डॉट एयूला मुलाखत दिली. बॉलशी छेडछाड केल्यामुळे स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचं वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं आहे. २९ मार्चला या दोघांची बंदी उठेल.
या मुलाखतीमध्ये पाँटिंगला ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप जिंकण्याच्या शक्यतेबद्दल विचारण्यात आलं. 'ऑस्ट्रेलिया हा वर्ल्ड कप जिंकू शकते, पण भारत आणि इंग्लंडच्या टीम मजबूत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये स्मिथ आणि वॉर्नर आले तर ही टीमही तितकीच मजबूत होईल', असं वक्तव्य पाँटिंगनं केलं. १९९६ साली पाँटिंग पहिला वर्ल्ड कप खेळला होता. रिकी पाँटिंगनं ५ वर्ल्ड कप खेळले. यातले ३ वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया जिंकली. २००३ आणि २००७ साली पाँटिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियानं वर्ल्ड कपमध्ये विजय मिळाला.
ऑस्ट्रेलियाची टीम मागच्या २६ वनडे मॅचपैकी फक्त ४ मॅच जिंकल्या आहेत. पण पाँटिंगनं ऑस्ट्रेलियाच्या टीमकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली आहे. 'इंग्लंडमधली परिस्थिती ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी अनुकूल असेल, मी ऑस्ट्रेलियाचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून हे बोलत नाही, पण ऑस्ट्रेलिया खरच दावेदार असेल, असं मला वाटतंय', असं पाँटिंग म्हणाला.
आयसीसीच्या सध्याच्या क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलिया सहाव्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीत इंग्लंड पहिल्या आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही टीमनंतर दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि पाकिस्तानच्या टीमचा नंबर लागतो.