मुंबई : यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये लागलेल्या काही अनपेक्षित निकालामुळे सेमी फायनलची रेस आणखी रोमांचक झाली आहे. आतापर्यंतचे मुकाबले बघितले तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करु शकतात. जर असं झालं तर भारत आणि पाकिस्तानच्या टीम पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये दोनवेळा एकमेकांविरुद्ध खेळतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत-पाकिस्तान यांच्यातल्या संभाव्य लढतीआधी आपल्याला या वर्ल्ड कपचं आणि सेमी फायनलचं गणित समजून घ्यावं लागेल. पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर (११ पॉईंट्स), ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर (१० पॉईंट्स), भारत तिसऱ्या क्रमांकावर (९ पॉईंट्स), इंग्लंड चौथ्या क्रमांकावर (८ पॉईंट्स), आहेत. तर बांगलादेश पाचव्या क्रमांकावर (७ पॉईंट्स), श्रीलंका सहाव्या क्रमांकावर (६ पॉईंट्स), पाकिस्तान सातव्या क्रमांकावर (५ पॉईंट्स), वेस्ट इंडिज आठव्या क्रमांकावर (३ पॉईंट्स) आहे. या आठही टीम सध्या सेमी फायनलच्या रेसमध्ये आहेत. तर दक्षिण आफ्रिका (३ पॉईंट्स) आणि अफगाणिस्तान (० पॉईंट) या रेसमधून बाहेर आहे.



सध्याच्या परिस्थितीमध्ये न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि भारताचं सेमी फायनल खेळणं जवळपास निश्चित आहे. तर चौथ्या स्थानासाठी पाच टीम (इंग्लंड, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज) यांच्यामध्ये स्पर्धा आहे.


पाकिस्तानने आपल्या ६ मॅचपैकी २ मॅच जिंकल्या आहेत. पाकिस्तानच्या खात्यात ५ पॉईंट्स आहेत. आता पाकिस्तानला न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध खेळायचं आहे. जर पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला तर त्यांचे ११ पॉईंट्स होतील. तसंच जर इंग्लंड त्यांच्या दोन मॅच आणि बांगलादेश आणि श्रीलंका त्यांची एक-एक मॅच हरली तर पाकिस्तान सेमी फायनलमध्ये पोहोचू शकते. पाकिस्तानची ११ पॉईंट्ससह सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्याचीही शक्यता आहे.


पहिल्या स्थानासाठी भारत-न्यूझीलंडमध्ये स्पर्धा आहे. या दोन्ही टीमनी आतापर्यंत या वर्ल्ड कपमध्ये एकही मॅच हरली नाही. त्यामुळे पहिल्या फेरीच्या शेवटी दोन्ही टीमना पहिल्या क्रमांकावर राहायची संधी आहे. जर भारत पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिला तर सेमी फायनलमध्ये त्यांचा मुकाबला पॉईंट्स टेबलमधल्या चौथ्या क्रमांकाच्या टीमशी होईल. त्यामुळे पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यातल्या मॅचची शक्यता नाकारता येत नाही. दुसऱ्या सेमी फायनलमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या टीम खेळतील.


भारताला आता वेस्ट इंडिज, इंग्लंड, बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध खेळायचं आहे. इंग्लंड सोडलं तर उरलेल्या तिन्ही मॅचमध्ये भारत जिंकण्याचा दावेदार आहे. जर भारत चारही मॅच जिंकला तर त्यांच्या खात्यात १७ पॉईंट्स होतील. दुसरीकडे न्यूझीलंडचे सामने पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध आहेत. या तिन्ही मॅच किवींसाठी कठीण असतील. न्यूझीलंडचा जर फक्त पाकिस्तानकडून पराभव झाला, तर त्यांचे जास्तीत जास्त १५ पॉईंट्स होतील. त्यामुळे ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर राहू शकतात.