मॅनचेस्टर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये पावसाचाच खेळ पाहायला मिळाला. यामुळे उरलेला सामना हा उद्या म्हणजेच बुधवारी खेळवण्यात येणार आहे. सेमी फायनलमध्ये राखीव दिवस असल्यामुळे मॅच दुसऱ्या दिवशी खेळवण्यात येईल. न्यूझीलंडचा स्कोअर ४६.१ ओव्हरमध्ये २११/५ एवढा झाल्यानंतर पावसाला सुरुवात झाली, आणि यानंतर पुन्हा मॅच सुरुच झाली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय बॉलरनी भेदक मारा करत न्यूझीलंडच्या बॅट्समनना रोखलं. पहिल्या १० ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा स्कोअर २७/१ एवढा होता. या वर्ल्ड कपमधली पहिल्या पावरप्लेमधली ही सगळ्यात कमी धावसंख्या होती. यानंतर मात्र कर्णधार केन विलियमसनने आणि हेन्री निकल्स आणि मग रॉस टेलरसोबत न्यूझीलंडची इनिंग सावरली.


हेन्री निकल्स २८ रन करून आऊट झाला, तर केन विलियमसनने ६७ रनची खेळी केली. रॉस टेलर नाबाद ६७ रनवर खेळत आहे. टेलरबरोबर टॉम लेथम ३ रनवर नाबाद आहे. भारताकडून भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि युझवेंद्र चहलला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.


बुधवारी जेव्हा खेळ सुरु होईल तेव्हा न्यूझीलंड ४६.१ ओव्हरपासून सुरु करेल. उद्याच्या दिवशीही पावसामुळे सामना होऊ शकला नाही, तर टीम इंडिया फायनलमध्ये प्रवेश करेल. ग्रुप स्टेजमध्ये पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडपेक्षा वरच्या क्रमांकावर असल्यामुळे टीम इंडिया फायनल गाठेल. पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर तर न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर होती.