लीड्स : क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाने नवा विक्रम केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या या मॅचमध्ये टीम इंडियाने दोन बदल केले. युझवेंद्र चहल आणि मोहम्मद शमीला या मॅचमध्ये विश्रांती देण्यात आली. या दोघांच्याऐवजी रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव टीममध्ये आले. जडेजाची या वर्ल्ड कपमधली ही पहिलीच मॅच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने या वर्ल्ड कपमध्ये याआधी १५ खेळाडूंना संधी दिली होती. रवींद्र जडेजा या वर्ल्ड कपमध्ये खेळणारा १६वा भारतीय ठरला. याचबरोबर एका वर्ल्ड कपमध्ये १६ खेळाडू खेळण्याची भारताची ही पहिलीच वेळ होती. याआधी २०११ वर्ल्ड कपमध्ये भारताने १५ खेळाडूंना संधी दिली होती. 


वर्ल्ड कपमध्ये एक टीम जास्तीत जास्त १५ खेळाडूंची निवड होते. पण शिखर धवन आणि विजय शंकर दुखापतींमुळे वर्ल्ड कपच्या अर्ध्यातूनच बाहेर पडले. या दोघांच्याऐवजी ऋषभ पंत आणि मयंक अग्रवालची निवड करण्यात आली. काहीच दिवसांपूर्वी मयंक अग्रवाल इंग्लंडला पोहोचला, पण त्याला अजूनही अंतिम-११ खेळाडूंमध्ये संधी मिळालेली नाही. 


सध्याच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक खेळाडू खेळवण्याचा विक्रम अफगाणिस्तानने केला आहे. अफगाणिस्तानने या स्पर्धेत १७ खेळाडू मैदानात उतरवले. भारत, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेने प्रत्येकी १६ खेळाडूंना संधी दिली. तर ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेने १५-१५ खेळाडूंना खेळवलं. बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडने १४ खेळाडूंना आणि इंग्लंडने सगळ्यात कमी १३ खेळाडूंना संधी दिली.