मुंबई : यंदाच्या वर्ल्ड कपमधली टीम इंडियाची शेवटची मॅच धोनीचीही अखेरची मॅच असू शकते, असं वृत्त पीटीआयने दिलं आहे. या वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाने प्रवेश केला आहे. सेमी फायनल जिंकून १४ जुलैला होणाऱ्या फायनलमध्येही टीम इंडियाने विजय मिळवला, तर धोनीसाठी निवृत्ती घ्यायची ती योग्य वेळ असू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'धोनीबद्दल तुम्ही काहीही सांगू शकत नाही. पण वर्ल्ड कपनंतर धोनी भारताकडून खेळेल, याची शक्यता कामी आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून कर्णधारपद सोडणं आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेणं हे निर्णय धोनीने अचानक घेतले होते. त्यामुळे धोनीबद्दल काहीही अंदाज बांधता येत नाहीत,' असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितलं.


बीसीसीआयचा अधिकारी हे म्हणत असला, तरी भारतीय टीम प्रशासनाने याबद्दल काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या वर्ल्ड कपमध्ये धोनीने ९३ च्या स्ट्राईक रेटने २२३ रन केल्या आहेत. धोनीची ही कामगिरी चांगली दिसत असली तरी स्ट्राईक रोटेट करणं धोनीला कठीण जात आहे. तसंच सुरुवातीच्या काही ओव्हरमध्ये धोनी संथ खेळत आहे. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनीही धोनीच्या या खेळीवर टीका केली.


सध्याच्या निवड समितीचा कालावधी हा ऑक्टोबर महिन्यापर्यंत असेल. ऑक्टोबर महिन्यात नव्या निवड समितीसह २०२० सालच्या टी-२० वर्ल्ड कपसाठीची टीम उभारणी सुरु होणार आहे.