बर्मिंघम : वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाने मैदानात उतरताच रेकॉर्ड केलं आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाने केदार जाधवऐवजी दिनेश कार्तिकला संधी दिली. यामुळे टीम इंडिया या मॅचमध्ये ३ स्पेशलिस्ट विकेट कीपर घेऊन मैदानात उतरली. धोनी, ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक हे तीन विकेट कीपर बांगलादेशविरुद्धची मॅच खेळत आहेत. याचबरोबर केएल राहुल हादेखील स्थानिक क्रिकेटमध्ये विकेट कीपिंग करतो. यामुळे टीम इंडियाच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये ४ विकेट कीपर आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केएल राहुल आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळताता विकेट कीपिंग करतो. पहिल्यांदाच भारतीय टीम तीन स्पेशलिस्ट विकेट कीपर घेऊन खेळत आहे. याआधी १९८७ सालच्या वर्ल्ड कपमध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात खेळताना टीम इंडियाने किरण मोरे आणि चंद्रकांत पंडित यांना संधी दिली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडिया कार्तिक आणि धोनी या दोघांना घेऊन आधीही खेळली आहे. तर मागच्याच मॅचमध्ये धोनी आणि पंत खेळले होते. 


याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये जॉनी बेयरस्टो, जॉस बटलर आणि बेन फोक्स या तीन विकेट कीपरना खेळवलं होतं.


टीम इंडियाची रणनिती का अपरिहार्यता?


४ विकेट कीपर घेऊन खेळणं ही टीम इंडियाची रणनितीपेक्षा अपरिहार्यता असल्याचंच म्हणावं लागेल. इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये फटकेबाजी करायची गरज असताना केदार जाधव आणि धोनीने एक-एक रन काढली. यानंतर दोन्ही खेळाडूंवर टीकाही झाली. या खेळीबद्दल धोनी आणि केदारशी बसून बोलावं लागेल, असं कर्णधार विराट कोहली म्हणाला होता. या वर्ल्ड कपमध्ये केदार जाधवला बॅटिंगची फारशी संधी मिळाली नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये केदार जाधवने महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली होती. या मॅचमध्ये टीम इंडियाचा ११ रननी विजय झाला होता.