मॅनचेस्टर : विश्वविजेता बनण्यापासून भारतीय क्रिकेट संघ आता केवळ दोन विजय दूर आहे. उपांत्य फेरीत भारताचा मुकाबला न्यूझीलंडशी होणार आहे. साखळी फेरीत भारतानं किवींपेक्षा चांगली कामगिरी केली असून या सामन्यात भारताचं पारड जड वाटतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साखळी फेरीत भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. यामुळे या स्पर्धेत दोन्ही संघांना एकमेकांची ताकद आजमावता आलेली नाही. देशवासिय पुन्हा एकदा रोहितचं शतक पाहण्यासाठी आतूर आहेत. यावेळी विराटनंही मोठी खेळी साकारावी अशीही तमाम देशवासियांची इच्छा आहे. सलामीचा केएल. राहुल आणि चौथ्या स्थानावरील रिषभ पंत आता खेळपट्टीवर रुळले असून त्यांच्याकडूनही आता अपेक्षा वाढल्या आहेत. तर अस्सल धोनीचं दर्शन घडावं हिदेखील इच्छा आहे. दरनम्या भारतीय संघ कोणत्याही प्रकारचा दबाव पेलण्यासाठी समर्थ असल्याचं कर्णधार विराट कोहलीनं सामन्यापूर्वी सांगितलं.


केन विलियमनसन, मार्टिन गप्टिल, रॉस टेलर या किवींच्या फलंदाजांना बुमराह एँड कंपनीचं आव्हान पेलवावं लागणार आहे. तर ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, टीम साऊदी यांच्यासमोर भारताच्या मध्यफळीला विकेट गमावून चालणार नाही.


विश्वचषकामध्ये दोन्ही संघांमध्ये ८ मुकाबले झाले असून भारतानं ३ तर न्यूझीलंडनं ४ सामने जिंकले आहेत. तर एक सामना अनिर्णित राहिलाय. 


दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण १०६ सामने झाले असून भारतानं ५५ तर न्यूझीलंडनं ४५ सामने जिंकले आहेत. यातील एक सामना बरोबरीत राहिलाय. तर ५ सामने अनिर्णित राहिलेत.


२००८मधील १९ वर्षांखालील विश्वचषकामध्ये विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ आणि केन विलियमसनच्या नेतृत्त्वाखाली न्यूझीलंड संघ भिडला होता. त्या सामन्याच्या निकालाची पुनरावृत्ती व्हावी अशीच भारतीय क्रिकेटचाहत्यांची इच्छा आहे.


या सामन्यात भारताचं पारड जड वाटतंय. विश्वचषकापासून केवळ दोन पाऊल दूर असल्यानं कोहली एँड कंपनी या सामन्यात जीवतोड खेळ करतील आणि भारत अंतिम फेरीत दाखल होईल असा तमाम देशवासियांना विश्वास वाटतोय.