मुंबई : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत मैदानात आला. पहिल्या सामन्यापासून या संघाची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. उपांत्य सामन्यापर्यंत मजल मारणाऱ्या या संघात विराटने कायमच सर्व खेळाडूंमध्ये समतोल राखल्याचं पाहायला मिळालं. न्यूझीलंड विरोधात मैदानात उतरण्यापूर्वी विराटने माध्यमांशी संवाद साधताना संघाविषयी काही माहिती दिल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्याने संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा यष्टीरक्षक महेंद्र सिंह धोनी याच्याविषयीही लक्षवेधी वक्तव्य केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनी आणि विराटचं समीकरण नेमकं किती खास आहे हे प्रत्येक क्रीडारसिकाला ठाऊक आहे. माहीप्रती आपलं मत मांडण्याची संधी मिळताच विराटने त्याच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. यावेळी त्याच्या चेहऱ्यावाटेही प्रचंड अभिमानाच्या भावना व्यक्त होत होत्या. 'धोनीच्या नेतृत्वामध्ये क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात करणं ही बाब अतिशय महत्त्वाची असून, आमच्यासारख्यांसाठी हे कधीही बदलणार नाही', असं त्याने आवर्जुन सांगितलं. 


'आजवर आम्हाला दिलेली प्रत्येक संधी, आमच्यावर असणारा त्याचा विश्वास आणि गेल्या कित्येक वर्षांमध्ये संघात होणाऱ्या प्रत्येक बदलाला मोठ्या शिताफीने हाताळण्याचं त्याचं कौशल्य पाहता माहीप्रती असणारा आदर हा कायमस्वरूपी तसाच राहील', असा विश्वास विराटने माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला. 


भारतीय क्रिकेट संघ आज ज्या स्थानावर आहे त्याला या ठिकाणी आणण्यामध्ये माहीचं मोलायं योगदान असल्याची बाबही त्याने अधोरेखित केली. एखादी व्यक्ती ज्यावेळी संघासाठी खूप काही करुन जाते, त्यावेळी त्यांच्या प्रत्येक निर्णयाची, कृतीची दाद दिलीच गेली पाहिजे, असंही विराटने स्पष्ट केलं. 


जागतिक स्तरावर भारतीय क्रिकेटकडे पाहण्याचा इतरांचा आदरयुक्त दृष्टीकोन पाहता आपल्या मनात त्याच्याप्रती प्रचंड आदर असून, आभाळाप्रमाणे तो आदर पुढेही वाढतच राहील अशी भावना व्यक्त केली. 


अनेक वर्षांसाठी कर्णधारपद भूषवल्यानंतर एक खेळाडू म्हणून संघासोबत खेळत राहणं हे अतिशय आव्हानात्मक असल्याचं म्हणत या एका गोष्टीमुळेही आपल्या नजरेत धोनीसाठी कमालीचा आदर असल्याचं विराट म्हणाला. 'इतरांना त्यांच्या कक्षा रुंदावण्याची आणि त्यांचे निर्णय घेऊ देण्याचं स्वातंत्र्य धोनी कायम देत आला आहे. शिवाय गरज पडेल तेव्हा मदतीसाठीही तो कायम हजर असतो. त्याचे हेच गुण त्याच्याप्रती असणारी आदराची भावना आणखी वाढवून जातो', असं विराट म्हणाला.