मुंबई : क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचं प्रत्येक भारतीय खेळाडूचं स्वप्न असतं. वर्ल्ड कप टीममध्ये निवड होणं खेळाडूच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा क्षण असतो. पण असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांची टीम इंडियामध्ये निवड तर झाली, पण त्यांना वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९७५ साली पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप खेळवण्यात आला होता. या वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीममध्ये १२ खेळाडूंची निवड करण्यात आली होती. वेंकटराघवन यांच्या नेतृत्वात खेळवण्यात आलेल्या या वर्ल्ड कपमध्ये सगळ्या १२ खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली होती.


१९७९ सालच्या वर्ल्ड कपमध्ये १३ खेळाडूंची निवड झाली होती. यातल्या १२ खेळाडूंना वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळाली. भरत रेड्डी या वर्ल्ड कपमध्ये एकही मॅच न खेळता भारतात परत आले. अशाप्रकारे टीममध्ये निवड झाल्यानंतही वर्ल्ड कपमध्ये न खेळणार भरत रेड्डी हे पहिले भारतीय खेळाडू ठरले.


१९८३ सालचा वर्ल्ड कप भारतीय क्रिकेटसाठी मैलाचा दगड ठरला. कपिल देव यांच्या नेतृत्वात १४ भारतीय खेळाडू इंग्लंडला गेले होते. यातल्या १३ खेळाडूंना वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळाली. यावेळी सुनील वाल्सन यांना एकही मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही. योगायोगाने यानंतर सुनील वाल्सन यांची कधीच भारतीय टीममध्ये निवड झाली नाही. वर्ल्ड कपच्या टीममध्ये असूनही एकही आंतरराष्ट्रीय मॅच न खेळण्याचं रेकॉर्ड सुनील विल्सन यांच्या नावावर आहे.


१९८७, १९९२ आणि १९९६ साली निवड झालेल्या प्रत्येक भारतीय खेळाडूला वर्ल्ड कपची मॅच खेळण्याची संधी मिळाली. पण १९९९ साली अमेय खुरासिया वर्ल्ड कपच्या टीममध्ये असूनही एकही मॅच न खेळता परतला. यानंतर २००३ वर्ल्ड कपमध्ये संजय बांगर आणि पार्थिव पटेल यांनाही खेळण्याची संधी मिळाली नाही.


२००७ वर्ल्ड कपमध्ये इरफान पठाण आणि दिनेश कार्तिक या खेळाडूंना अंतिम ११ खेळाडूंमध्ये जागा मिळाली नाही. इरफान पठाणची यानंतर कधीच वर्ल्ड कप टीममध्ये निवड झाली नाही. पण दिनेश कार्तिकची १२ वर्षानंतर पुन्हा एकदा २०१९ वर्ल्ड कप टीममध्ये निवड झाली. पण या वर्ल्ड कपमध्ये दिनेश कार्तिकला अजूनही मैदानात उतरायची वेळ आली नाही.


२०१५ वर्ल्ड कपमध्ये अक्षर पटेल, अंबाती रायुडू आणि स्टुअर्ट बिनी यांची भारतीय टीममध्ये निवड होऊनही त्यांना खेळायला मिळालं नाही. २०१९ वर्ल्ड कपमध्ये अंबाती रायुडूच्या निवडीची शक्यता होती, पण त्याच्याऐवजी ऑलराऊंडर विजय शंकरला संधी मिळाली.