World Cup 2019 : वेस्ट इंडिजला धक्का, आंद्रे रसेल वर्ल्ड कपमधून बाहेर
वर्ल्ड कपमध्ये करो या मरोच्या स्थितीत असणाऱ्या वेस्ट इंडिजला मोठा धक्का लागला आहे.
लंडन : वर्ल्ड कपमध्ये करो या मरोच्या स्थितीत असणाऱ्या वेस्ट इंडिजला मोठा धक्का लागला आहे. वेस्ट इंडिजचा स्टार ऑलराऊंडर आंद्रे रसेल दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे. दुखापतीमुळे रसेल न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये खेळला नव्हता. ही मॅच वेस्ट इंडिज ५ रननी हरली होती. या स्पर्धेत रसेल ४ मॅच खेळला, पण त्याला फारशी कमाल दाखवता आली नाही. पण बॉलिंगमध्ये शानदार कामगिरी करत त्याने ५ विकेट घेतल्या. ३ मॅचमध्ये रसेलला बॅटिंग मिळाली, पण त्याला फक्त ३६ रन करता आले.
वेस्ट इंडिजने या वर्ल्ड कपमध्ये ६ मॅच खेळल्या आहेत. यातल्या ४ मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. तर एक मॅचमध्ये विजय झाला आणि एक मॅच पावसामुळे रद्द झाली. यामुळे वेस्ट इंडिजच्या खात्यात ३ पॉईंट्स आहेत. उरलेल्या तिन्ही मॅच जिंकल्या तरी वेस्ट इंडिजचे ९ पॉईंट्स होतील. तरीदेखील त्यांना सेमी फायनलच्या प्रवेशासाठी दुसऱ्या टीमवर अवलंबून राहावं लागणार आहे.
आंद्रे रसेलच्या जागी वेस्ट इंडिजच्या टीममध्ये सुनिल अंबरिसची निवड झाली आहे. आयसीसीने या निवडीला परवानगी दिली आहे. याबाबत आयसीसीने ट्विट करुन माहिती दिली आहे. २६ वर्षांचा सुनिल अंबरीस बॅट्समन आहे. नुकत्याच आयर्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये अंबरीसने १४८ रनची खेळी केली होती. हा त्याच्या वनडे कारकिर्दीतला सर्वाधिक स्कोअर होता. अंबरीसने ६ मॅचमध्ये १०५.३३ च्या सरासरीने ३१६ रन केले आहेत.