वेलिंग्टन : २०१९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंडने ऐतिहासिक कामगिरी केली. पहिल्यांदाच एखाद्या वर्ल्ड कपची फायनल आणि सुपर ओव्हर टाय झाली. अखेर इंग्लंडने न्यूझीलंडपेक्षा जास्त बाऊंड्रीज मारल्यामुळे त्यांना विजेता घोषित करण्यात आलं. पण वर्ल्ड कप फायनलचा हा थरार बघताना न्यूझीलंडचा खेळाडू जिमी नीशमच्या प्रशिक्षकांचा मृत्यू झाला. ही मॅच बघत असताना नीशमच्या प्रशिक्षकाना हृदयविकाराचा धक्का लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड कपच्या या फायनलमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंडने ५० ओव्हरमध्ये प्रत्येकी २४१ रन बनवले. यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्येही दोन्ही टीमना प्रत्येकी १५-१५ रनच करता आल्या. 'सुपर ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला जिमी नीशमने सिक्स मारली, यानंतर डेव्ह गॉर्डन यांना हृदयविकाराचा धक्का लागला,' असं त्यांची मुलगी लियोनीने सांगितलं. जेम्स गॉर्डन हे ऑकलंड ग्रामर स्कूलमध्ये माजी शिक्षक आणि प्रशिक्षक होते.



जिमी नीशम त्याच्या प्रशिक्षकांबद्दल एक ट्विट केलं आहे. 'डेव्ह गॉर्डन माझ्या शाळेत शिक्षक, प्रशिक्षक आणि मित्र होते. तुमचं या खेळाप्रती असलेलं प्रेम खूप जास्त होतं. आमच्यासारख्यांना तुमचं मार्गदर्शन मिळाल्याचं भाग्य आम्हाला लाभलं. मॅच संपेपर्यंत तुम्ही श्वास रोखून धरलात. तुम्हाला अभिमान वाटला असेल, हीच अपेक्षा. धन्यवाद. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो,' असं भावनिक ट्विट जिमी नीशमने केलं.



डेव्ह गॉर्डन यांनी जिमी नीशम, लॉकी फर्ग्युसन यांच्यासारख्या न्यूझीलंडच्या अनेक खेळाडूंना हायस्कूलमध्ये प्रशिक्षण दिलं. २५ वर्ष ते क्रिकेट आणि हॉकीचं प्रशिक्षण देत होते.