साऊथम्पटन : वर्ल्ड कपच्या मॅचआधी टीम इंडियाच्या पत्रकार परिषदेवर माध्यमांनी बहिष्कार घातल्याची घटना घडली आहे. टीम इंडियाच्या सरावानंतर पत्रकार परिषदेसाठी आवेश खान आणि दीपक चहर यांना पाठवण्यात आलं. हे दोन्ही खेळाडू १५ सदस्यीय टीममध्ये नाहीत. आवेश खान आणि दीपक चहर यांना खेळाडूंच्या सरावासाठी नेट बॉलर म्हणून इंग्लंडला नेण्यात आलं आहे. टीम इंडियाच्या सदस्यांना पत्रकार परिषदेला पाठवलं नसल्याने माध्यमांच्या प्रतिनिधींनी या पत्रकार परिषदेवर बहिष्कार घातला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जानेवारी २०१७ साली विराट कोहली पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर टीम इंडिया आणि माध्यमांमधलं नातं फारसं चांगलं राहिलं नाही. खेळाडूंना पत्रकार परिषदेला पाठवण्यात फारसा रस नसल्याचंही अनेकवेळा दिसून आलं आहे.


वर्ल्ड कपच्या प्रोटोकॉलनुसार आयसीसी खेळाडूंचं रोजचं वेळापत्रक माध्यमांच्या प्रतिनिधींना पाठवतं. यामध्ये खेळाडूंचा सराव आणि पत्रकार परिषद याचा समावेश असतो. २४ मेरोजी भारतीय टीम इंग्लंडमध्ये पोहोचली. यानंतर २८ मेरोजी केएल राहुल याने शेवटची पत्रकार परिषद घेतली. बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात शतक केल्यानंतर राहुल पत्रकारांसमोर आला.


केएल राहुलच्या पत्रकार परिषदेनंतर भारताने ४ वेळा सराव केला. रविवारी भारतीय टीम स्थानिक वेळेनुसार सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत सराव करेल, असा मेल आयसीसीकडून माध्यमांच्या प्रतिनिधींना पाठवण्यात आला होता. पण पत्रकार परिषदेबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. पण टीम इंडिया आणि भारतीय पत्रकारांच्या व्हॉट्स ऍप ग्रुपवर सरावानंतर पत्रकार परिषद होईल, असा मेसेज देण्यात आला.


टीम इंडियाचा सराव संपल्यानंतर दीपक चहर आणि आवेश खान पत्रकार परिषद घेण्यासाठी आले, पण या दोघांना पाहून पत्रकार नाराज झाले आणि त्यांनी पत्रकार परिषदेवरच बहिष्कार घातला.


टीम इंडियाची अजून एकही वर्ल्ड कपची मॅच झालेली नसताना खेळाडू काय बोलणार? असा प्रश्न बीसीसीआयच्या माध्यम प्रतिनिधींनी पत्रकारांना विचारला. या सगळ्या वादावादीनंतर बीसीसीआयचा प्रतिनिधी एखादा खेळाडू पत्रकार परिषदेसाठी येईल का? हे पाहण्यासाठी गेला. परत आल्यानंतर या प्रतिनिधीने चहर आणि आवेश खान हे दोनच पर्याय असल्याचं सांगितलं, यामुळे पत्रकार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.