`मुस्लिमांना पुढे येऊ द्यायचं नाही, म्हणून भाजपने शामीला वगळलं`
२०१९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमी फायनलच्या चारही टीम आता ठरल्या आहेत.
मुंबई : २०१९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमी फायनलच्या चारही टीम आता ठरल्या आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या टीमनी सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पण पाकिस्तानचे न्यूझीलंडएवढेच पॉईंट्स असूनही त्यांना सेमी फायनल गाठता आली नाही. पाकिस्तानपेक्षा चांगला नेट रनरेट असल्यामुळे न्यूझीलंड सेमी फायनलमध्ये पोहोचली. पण पाकिस्तानमधले क्रिकेट समिक्षक मात्र भारतावर निशाणा साधण्याचा वारंवार प्रयत्न करत आहेत.
'भाजपला मुस्लिमांना पुढे येऊन द्यायचं नाही, म्हणून मोहम्मद शामीला चांगल्या कामगिरीनंतरही वगळण्यात आलं,' असं वादग्रस्त वक्तव्य पाकिस्तानमधल्या एका तज्ज्ञाने केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये मोहम्मद शामीला विश्रांती देण्यात आली होती. मोहम्मद शामीऐवजी भुवनेश्वर कुमारला टीममध्ये जागा मिळाली.
'मी शामीला टीममधून वगळलं नसतं. तुमचा एक बॉलर ३ मॅचमध्ये १२-१३ विकेट घेतो. पण तुम्ही त्याला एकदम बाहेर बसवता. तो रेकॉर्डकडे जात होता, शामीला टॉप २-३ बॉलरमध्ये पोहोचला असता. शमीला बाहेर बसवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आहे का? वर्ल्ड कपमध्ये त्याला घेऊन तर आले आहेत, पण त्याला खेळवू इच्छित नाहीत. मुस्लिमांना पुढे येऊन द्यायचं नाही, हा भाजपचा अजेंडा आहे. त्यामुळे मला आश्चर्य वाटत नाही,' असं पाकिस्तानमधला तज्ज्ञ आज न्यूज या चॅनलशी बोलताना म्हणाला.
याआधीही वर्ल्ड कपदरम्यान पाकिस्तानचा क्रिकेटपटू अब्दुल रझाकने मोहम्मद शामीचा धर्म काढला होता. 'भारताकडे चांगले बॉलर आहेत, पण बुमराह आणि चहलला चांगली बॉलिंग केल्यानंतरही विकेट मिळत नाहीयेत. पण मोहम्मद शामी आपलं काम करत आहे. तो मुसलमान आहे ही चांगली गोष्ट आहे. जरी तो भारताकडून खेळत असला तरी,' असं वादग्रस्त वक्तव्य अब्दुल रझाकने केलं होतं.