World Cup 2019 : रविवारी भारताला पाठिंबा देणार का इंग्लंडला? नासिर हुसेनचा पाकिस्तानी चाहत्यांना सवाल
इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने पाकिस्तानच्या चाहत्यांना ट्विट करुन एक प्रश्न विचारला आहे.
मुंबई : इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने पाकिस्तानच्या चाहत्यांना ट्विट करुन एक प्रश्न विचारला आहे. रविवारी भारत आणि इंग्लंड यांच्या मॅचमध्ये तुम्ही कोणाला पाठिंबा देणार? असं ट्विट नासिर हुसेनने केलं आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये प्रबळ दावेदार असणारी इंग्लंड आता करो या मरो स्थितीमध्ये आहे. तर पाकिस्तानची अवस्थाही तशीच आहे.
इंग्लंडला वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर त्यांना उरलेल्या दोन्ही मॅच जिंकाव्या लागतील. इंग्लंडच्या या दोन मॅच भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आहे. ८ पॉईंट्ससह इंग्लंड सध्या चौथ्या क्रमांकावर आहे.
सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी इंग्लंडबरोबरच पाकिस्तानची टीमही शर्यतीत आहे. भारताविरुद्धच्या मॅचमध्ये इंग्लंडचा पराभव झाला तर याचा थेट फायदा पाकिस्तानला होऊ शकतो.
पॉईंट्स टेबलमध्ये पाकिस्तानची टीम ७ पॉईंट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा ७ मॅचपैकी ३ मॅचमध्ये विजय आणि ३ मॅचमध्ये पराभव झाला, तर एक मॅच पावसामुळे रद्द झाली. उरलेल्या दोन्ही मॅच जिंकल्या तर पाकिस्तानचे ११ पॉईंट्स होतील आणि इंग्लंडचा एका मॅचमध्ये पराभव झाला तर ते जास्तीत जास्त १० पॉईंट्सपर्यंत पोहोचू शकतात. पाकिस्तानच्या उरलेल्या मॅच या बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्याविरुद्ध आहेत. त्यामुळे या दोन्ही मॅचमध्ये पाकिस्तानला विजयाचा विश्वास आहे.
सेमी फायनलच्या रेसमध्ये इंग्लंड आणि पाकिस्तानसोबतच बांगलादेश आणि श्रीलंकेच्या टीमही आहेत. बांगलादेशने ७ मॅचपैकी ३ मॅचमध्ये विजय आणि ३ मॅचमध्ये पराभव पत्करला. बांगलादेशची एक मॅच पावसामुळे रद्द झाली. श्रीलंकेने ६ मॅचपैकी २ मॅच जिंकल्या आणि २ मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला, तर २ मॅच पावसामुळे रद्द झाल्या. श्रीलंकेच्या खात्यात सध्या ६ पॉईंट्स आहेत. उरलेल्या सगळ्या मॅच जिंकून श्रीलंका १२ पॉईंट्ससह सेमी फायनलमध्ये प्रवेश करु शकते.
ऑस्ट्रेलियाने याआधीच सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर न्यूझीलंड आणि भारताचा सेमी फायनल प्रवेशही जवळपास निश्चित आहे.