वर्ल्ड कप फायनलच्या वादानंतर न्यूझीलंडच्या प्रशिक्षकांचा आयसीसीला सल्ला
वर्ल्ड कपच्या रोमांचक अशा फायनलमध्ये इंग्लंडने ऐतिहासिक विजय मिळवला.
लंडन : वर्ल्ड कपच्या रोमांचक अशा फायनलमध्ये इंग्लंडने ऐतिहासिक विजय मिळवला. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातली ही मॅच टाय झाल्यानंतर खेळवण्यात आलेली सुपर ओव्हरही टाय झाली. अखेर इंग्लंडने न्यूझीलंडपेक्षा जास्त बाऊंड्री मारल्यामुळे इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं. आयसीसीच्या या नियमावर जगभरातून टीका होत आहे. यावर आता न्यूझीलंडच्या टीमकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.
अशा परिस्थितीमध्ये वर्ल्ड कपचा किताब दोन्ही टीमना वाटून देण्याबाबत आयसीसने विचार करावा, असा सल्ला न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी दिला आहे. 'जर तुम्ही ७ आठवडे खेळता आणि अशापद्धतीने फायनल होणार असेल, तर आयसीसीने याचा पुनर्विचार करायला हवा. या सगळ्याची समीक्षा व्हायला पाहिजे, कारण असं करण्याची हीच योग्य वेळ आहे. पण सध्या गोष्टी शांत होऊदेत,' असं गॅरी स्टीड म्हणाले.
न्यूझीलंडचे बॅटिंग प्रशिक्षक क्रेग मॅकमिलन यांनीही किताब दोन्ही टीमना देण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. 'यामुळे फायनलचा निर्णय बदलणार नाही. पण ७ आठवड्यानंतर फायनलमध्ये मॅच आणि सुपर ओव्हरही दोन्ही टीमच्या कामगिरीला वेगळं करू शकत नाहीत. रनच्या बाबतीत कोणत्याच टीमचा पराभव झाला नाही. त्यामुळे दोघांना विजेता घोषित करणं योग्य आहे,' असं वक्तव्य मॅकमिलन यांनी केलं.
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेली फायनल वादात सापडली आहे. बाऊंड्रीच्या वादाबरोबरच अंपायरनी दिलेल्या निर्णयावरही क्रिकेट रसिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. इंग्लंडला ३ बॉलमध्ये ९ रनची गरज असताना अंपायरनी ओव्हर थ्रोच्या रुपात ६ रन दिल्या. क्रिकेटच्या नियमानुसार अंपायरने ५ रनच दिल्या पाहिजे होत्या. आयसीसीचे माजी अंपायर सायमन टॉफेल यांनी अंपायरची ही चूक लक्षात आणून दिली.