World Cup 2019 : लागोपाठ ११ पराभवांनंतर अखेर पाकिस्तानचा विजय
लागोपाठ ११ वनडे मॅचमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर अखेर पाकिस्तानला विजय मिळाला आहे.
नॉटिंगहम : लागोपाठ ११ वनडे मॅचमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर अखेर पाकिस्तानला विजय मिळाला आहे. वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये पाकिस्तानने इंग्लंडचा १४ रननी पराभव केला आहे. पाकिस्तानने ठेवलेल्या ३४९ रन्सचा पाठलाग करताना इंग्लंडला ५० ओव्हरमध्ये ३३४/९ एवढ्या स्कोअरपर्यंत मजल मारता आली.
इंग्लंडकडून जो रूट आणि जॉस बटलर यांनी शतकी खेळी केली. जॉस बटलरने ७५ बॉलमध्येच त्याचं शतक पूर्ण केलं, पण शतक झाल्याच्या पुढच्याच बॉलला बटलर आऊट झाला. बटलरने ७६ बॉलमध्ये १०३ रन्स केले, यामध्ये ९ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. तर जो रूटने १०४ बॉलमध्ये १०७ रन्स केले. बटलर आणि रूट यांची शतकी खेळीही इंग्लंडला सामना जिंकवू शकली नाही.
पाकिस्तानकडून वहाब रियाझने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर शादाब खान आणि मोहम्मद आमिरला प्रत्येकी २-२ विकेट घेण्यात यश आलं. मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिकला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.
त्याआधी पाकिस्तानने ५० ओव्हरमध्ये ३४८/८ एवढा स्कोअर केला. या मॅचमध्ये इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गन याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर पाकिस्तानचे ओपनर इमाम उल हक आणि फकर झमान यांनी आक्रमक सुरुवात केली. १४ ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या ओपनरनी ८२ रन्सपर्यंत मजल मारली.
फकर झमान ३६ रन्सवर आणि इमाम उल हक ४४ रन्सवर आऊट झाले. बाबर आझम, मोहम्मद हफीज आणि सरफराज अहमद यांनी पाकिस्तानच्या इनिंगला आकार दिला. बाबर आझमने ६३ रन्स, मोहम्मद हाफिजने सर्वाधिक ८४ रन्स आणि सरफराज अहमदने ५५ रन्स केले.
इंग्लंडकडून क्रिस वोक्स आणि मोईन अली यांनी सर्वाधिक ३-३ विकेट घेतल्या. मार्क वूडला २ विकेट घेण्यात यश आलं.
यंदाच्या वर्ल्ड कपमधला पाकिस्तानचा हा पहिलाच विजय आणि इंग्लंडचा पहिला पराभव आहे. याआधी वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये पाकिस्तानचा १०५ रनवर ऑलआऊट झाला होता. तर इंग्लंडने पहिल्याच मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली होती. लागोपाठ ११ वनडेमध्ये पराभव झाल्यानंतर आता पाकिस्तान विजयाच्या पटरीवर आली आहे.