मॅनचेस्टर : वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला आहे. मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात झालेल्या या मॅचमध्ये भारताचा ८९ रननी विजय झाला. याचबरोबर वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्धची विजयी परंपरा कायम ठेवली आहे. पाकिस्तानविरुद्ध वर्ल्ड कपमध्ये भारताने सगळ्या ७ मॅच जिंकल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद पाकिस्तानी टीमच्या कामगिरीवर चांगलाच संतापला. बॉलिंग, फिल्डिंग आणि बॅटिंग सगळ्या भागातच पाकिस्तानने खराब कामगिरी केल्याचं सरफराजने मान्य केलं.


'फकर जमान आणि बाबर आजमनी पाकिस्तानला चांगली सुरुवात करुन दिली, पण आम्ही टीमला विजयापर्यंत पोहोचवू शकलो नाही. मी फक्त एका खेळाडूविषयी बोलत नाही, तर संपूर्ण टीमनेच खराब खेळ केला. आमच्या क्षमतेनुसार कामगिरी केली नाही.' असं सरफराज म्हणाला.



या मॅचमध्ये पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. पण पाकिस्तानच्या कर्णधाराचा हा निर्णय फसला. ओपनर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्यात शतकी पार्टनरशीप झाली. रोहित शर्माने १४० रनची धमाकेदार खेळी केली. तर राहुल आणि विराट कोहलीने अर्धशतकं केली. यामुळे भारताने पाकिस्तानला विजयासाठी ३३७ रनचं आव्हान दिलं.


भारताच्या या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला वारंवार धक्के लागले. फकर जमान आणि बाबर आजम यांच्यात झालेली शतकी पार्टनरशीप वगळता कोणत्याही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.