World Cup 2019: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यावर पावसाचं सावट
वर्ल्डकपमध्ये भारताचा आज पहिला सामना
साउथेम्प्टन : भारतीय टीम आज आयसीसी वर्ल्ड कप-2019 चा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध खेळणार आहे. साउथेम्प्टनच्या 'रोज बाउल क्रिकेट ग्राउंड'वर हा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता हा सामना सुरु होऊ शकतो. तर 2.30 वाजता टॉस होणार आहे.
साउथेम्प्टनमध्ये होणाऱ्या या सामन्यावर मात्र पावसाचं सावट आहे. सामन्याचा आधी टीम इडियाच्या खेळाडूंनी रोज बाउल क्रिकेट ग्राउंडवर सरावासाठी पाऊल ठेवताच जोरदार पावसाने त्यांचं स्वागत केलं. त्यामुळे त्यांना सराव करता नाही आला.
इंग्लंडमध्ये सध्याचं वातावरण असं आहे ज्यामुळे पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. कार्डिफमध्ये झालेल्या अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात देखील पावसाचा व्यत्यय पाहायला मिळाला.
साउथेम्प्टनमध्ये बुधवारी ढगाळ वातावरण राहणार आहे. ब्रिटिश हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं की, दुपारी येथे पावसाची शक्यता आहे. पण जास्त पाऊस पडणार नाही.' रोज बाउल स्टेडिअमची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी चांगली मानली जाते. त्यामुळे जी टीम टॉस जिंकेल ती आधी बॅटींग करण्याचा निर्णय घेईल.
रोज बाउलमध्ये भारतीय टीमने 3 वनडे सामने खेळले आहेत. ज्यामध्ये एक विजय तर ३ पराभव झाले आहेत. टीम इंडियाने 2004 मध्ये केनियाच्या विरोधात एकमेव विजय मिळवला आहे. 22 जूनला याच मैदानावर भारताचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे.