World Cup 2019 : वर्ल्ड कपला मुकलेला ऋषभ पंत टीम इंडियाला म्हणाला...
वर्ल्ड कप स्पर्धेला अवघे काही तास शिल्लक आहेत.
मुंबई : वर्ल्ड कप स्पर्धेला अवघे काही तास शिल्लक आहेत. उद्या म्हणजेच गुरुवारपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये यंदाच्या वर्ल्ड कपचा पहिला सामना रंगेल. या वर्ल्ड कपसाठी भारताला जगभरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत. भारताचा युवा खेळाडू ऋषभ पंत यानेही टीम इंडियाला वर्ल्ड कपसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतने ट्विटद्वारे शुभेच्छा देताना आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याने टीम इंडियाची जर्सी घातली आहे. आपल्या देशासाठी निळ्या रंगाची जर्सी घालण्यापेक्षा दुसरी कोणतीच अभिमानाची गोष्ट नाही. माझ्याकडून टीम इंडियाला वर्ल्डकप स्पर्धेसाठी शुभेच्छा. भारतात परतताना सोबत वर्ल्ड कपची ट्रॉफी घेऊन या, अशा शब्दात पंतने टीम इंडियाला वर्ल्ड कपसाठी शुभेच्छा दिल्या.
वर्ल्ड कपसाठीच्या टीमसाठी ऋषभ पंतला प्रबळ दावेदार समजले जात होते. पण त्याला अंतिम-१५ मध्ये स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे पंतच्या चाहत्यांची आणि पंतची निराशा झाली होती. दिनेश कार्तिकच्या विकेटकिपींगच्या अतिरिक्त अनुभवामुळे पंतची संधी हुकली.
दरम्यान पंतच्या तुलनेत कार्तिक अनुभवी आणि किंपींगचा अनुभव असल्याने कार्तिकला संधी देण्यात आली, अशी माहिती निवड समीतीच्या एमएसके प्रसाद यांनी दिली.
वर्ल्ड कप आधी टीम इंडियाने न्यूझीलंड आणि बांगलादेश सोबत सराव सामने खेळले. यात टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाला. तर भारताने बांगलादेशचा ९५ रनने पराभव केला. टीम इंडिया वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना ५ जूनला खेळणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवला जाणार आहे.