World Cup 2019 : `सिक्सर`नं जखमी झालेल्या महिलेचं रोहितनं असं जिंकलं मन
आपल्या फॅन्सना खूश करण्याचा रोहितचा हा अंदाजही प्रेक्षकांना भावलेला दिसतोय. त्यामुळेच तर रोहितचा हा फोटोदेखील व्हायरल होतोय
मुंबई / लंडन : भारताचा बॅटसमन रोहित शर्मा आयसीसी वर्ल्ड कप (ICC World Cup 2019) मध्ये आपल्या खेळण्यानं क्रिकेट रसिकांची मनं तर जिंकतोयच पण आपल्या वर्तवणुकीतूनही तो हे साध्य करतोय. त्याचं झालं असं की भारत विरुद्ध बांग्लादेश मॅचदरम्यान रोहितनं ठोकलेल्या सिक्सरनं प्रेक्षक आनंदी झाले... पण या सिक्सरमुळे उडालेला बॉल सरळ एका महिलेवर जाऊन आदळला. यामुळे ही महिला थोडी जखमी झाली... पण मॅचनंतर मात्र रोहितनं या महिलेची भेट घेतली आणि तिच्या चेहऱ्यावर आपसूकच खळखळून हसू उमटलं.
भारत विरुद्ध बांग्लादेश मॅच दरम्यान रोहितनं ९२ बॉलमध्ये १०४ रन केले. यावेळी, त्यानं ७ फोर आणि ५ सिक्सरही ठोकले. या दरम्यान त्याच्या एका बॉलमुळे प्रेक्षक गॅलरीत बसलेली एका महिला चांगलीच दुखावली गेली. मॅच पाहता पाहता तिच्यावर बॉल येऊन आदळला होता. भारतीय फॅन असलेल्या या महिलेचं नाव मीना असं आहे. मीनाला बॉल धडकल्याच्या क्षणाचा व्हिडिओ टीव्हीवरही दाखवण्यात आला होता.
पण, आपण ठोकलेल्या बॉलमुळे एक महिला फॅन दुखावली गेल्याची सल रोहितच्या मनाला लागून राहिली होती. त्यामुळे मॅच संपल्यानंतर लगेचच रोहितनं या महिला फॅनची भेट घेतली आणि तिला आपली एक भेटही दिली.
रोहितनं या महिलेला आपल्या ऑटोग्राफसहीत पिवळ्या रंगाची एक हॅट या महिलेला भेट म्हणून दिली. या क्षणाचाही एक फोटो समोर आलाय. या फोटोत रोहित मीनाला कदाचित कॅच पकडण्याची कला मजेशीर अंदाजात समजावतोय... तर त्याच्यासमोर उभी असलेली आणि या अनपेक्षित भेटीमुळे आनंदी झालेली मीना खळाळून हसताना दिसतेय.
आपल्या फॅन्सना खूश करण्याचा रोहितचा हा अंदाजही प्रेक्षकांना भावलेला दिसतोय. त्यामुळेच तर रोहितचा हा फोटोदेखील व्हायरल होतोय.
याच मॅचनंतर रोहितनं ८७ वर्षांच्या भारतीय फॅन चारुलता यांचीही भेट घेतली होती. मंगळवारी झालेल्या या मॅचमध्ये भारतानं बांग्लादेशला २८ रनांनी पछाडत सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये रोहितनं चार शतक ठोकलेत. उल्लेखनीय म्हणजे, अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू ठरलाय.