World Cup 2019 : शतकासोबतच रोहित शर्माचा विक्रमांचा पाऊस
वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे
बर्मिंघम : बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्माने दमदार शतक केलं. ९२ बॉलमध्ये १०४ रन करून रोहित शर्मा आऊट झाला. रोहित शर्माचं वनडे क्रिकेटमधलं हे २६वं शतक होतं. तर या वर्ल्ड कपमधलं रोहितचं हे चौथं शतक आहे. या वर्ल्ड कपमध्ये रोहितने दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड आणि आता बांगलादेशविरुद्ध शतक झळकवलं. एका वर्ल्ड कपमध्ये ४ शतकं झळकावणारा रोहित कुमार संगकारानंतरचा दुसरा खेळाडू आहे.
वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. सचिनने वर्ल्ड कपमध्ये एकूण ६ शतकं केली. पण सचिनने एकूण ६ वर्ल्ड कपमध्ये एवढी शतकं केली. सचिनला ६ शतकं करायला ४४ इनिंग लागल्या.
रोहित शर्माने वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत ५ शतकं केली आहेत. यातली ४ शतकं या वर्ल्ड कपमध्ये तर एक शतक मागच्या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्धच्या क्वार्टर फायनलमधलं आहे. रोहितने फक्त १५ इनिंगमध्येच ५ शतकं केली आहेत. या यादीमध्ये रिकी पाँटिंगने ४२ इनिंगमध्ये, कुमार संगकाराने ३५ इनिंगमध्ये ५ शतकं केली होती.
रोहितच्या सर्वाधिक रन
बांगलादेशविरुद्धच्या या खेळीबरोबरच रोहित शर्मा या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक खेळी करणारा खेळाडू बनला आहे. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला मागे टाकलं आहे. रोहितने या वर्ल्ड कपच्या ७ इनिंगमध्ये ५१९ रन केले आहेत. तर डेव्हिड वॉर्नरने ८ इनिंगमध्ये ५१६ आणि एरॉन फिंचने ८ इनिंगमध्ये ५०४ रन केले आहेत.
५०० पेक्षा जास्त रन करणारा दुसरा भारतीय
एका वर्ल्ड कप ५०० पेक्षा जास्त रन करणारा रोहित दुसरा भारतीय खेळाडू बनला आहे. याआधी सचिनने २ वर्ल्ड कपमध्ये ५०० पेक्षा जास्त रन केले होते. सचिनने २००३ वर्ल्ड कपमध्ये ६७३ रन आणि १९९६ वर्ल्ड कपमध्ये ५२३ रन केले होते.
वर्ल्ड कपमधली सगळ्यात मोठी पार्टनरशीप
बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्यामध्ये १७६ रनची ओपनिंग पार्टनरशीप झाली. वर्ल्ड कपमधली टीम इंडियाची ही सगळ्यात मोठी ओपनिंग पार्टनरशीप आहे.
१७६ रन- रोहित शर्मा-केएल राहुल- बांगलादेशविरुद्ध- २०१९
१७४ रन- रोहित शर्मा- शिखर धवन- आयर्लंडविरुद्ध- २०१५
१६३ रन- अजय जडेजा-सचिन तेंडुलकर- केनियाविरुद्ध- १९९६
१५३ रन- सचिन तेंडुलकर-वीरेंद्र सेहवाग- श्रीलंकेविरुद्ध- २००३
१ जानेवारी २०१७ नंतर सर्वाधिक शतकं
१६ शतकं- रोहित शर्मा- ६० इनिंग
१५ शतकं- विराट कोहली- ५७ इनिंग
८ शतकं- एरॉनन फिंच- ४० इनिंग
८ शतकं- जॉनी बेअरस्टो- ४७ इनिंग
८ शतकं- शिखर धवन- ५६ इनिंग
८ शतकं- जो रूट- ५९ इनिंग
७ शतकं- बाबर आजम- ५१ इनिंग