मुंबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. इंग्लंडमधलं सध्याचं वातावरण आणि खेळपट्ट्या बघता इथली परिस्थिती बॅट्समनना अनुकूल राहण्याची शक्यता आहे. वर्ल्ड कपसाठी इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या अशाच राहिल्या तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला सौरव गांगुलीचं २० वर्ष जुनं रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक ४ वर्षांनंतर होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये खेळाडू अनेक विक्रमांना गवसणी घालतात. २०१५ साली ऑस्ट्रेलियात झालेल्या वर्ल्ड कपमध्ये दोन द्विशतकं झळकवण्यात आली. वर्ल्ड कपमध्ये द्विशतकं करण्याची ती पहिलीच वेळ होती. भारताकडून मात्र आत्तापर्यंत कोणत्याच खेळाडूला वर्ल्ड कपमध्ये द्विशतक करता आलं नाही. वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सौरव गांगुलीने एका इनिंगमध्ये सर्वाधिक स्कोअर केला आहे. १९९९ सालच्या वर्ल्ड कपमध्ये गांगुलीने श्रीलंकेविरुद्ध १८३ रनची खेळी केली होती.


सौरव गांगुली आधी १९८३ सालच्या वर्ल्ड कपमध्ये कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध ऐतिहासिक १७५ रन केले होते. वर्ल्ड कपमध्ये बराच काळ कपिल देव यांचं हे रेकॉर्ड टिकून होतं. अखेर दक्षिण आफ्रिकेच्या गॅरी कर्स्टन यांनी हे रेकॉर्ड मोडलं.


सेहवाग सचिनलाही होती संधी


सौरव गांगुलीचं रेकॉर्ड मोडण्याची सेहवाग आणि सचिनलाही होती. २०११ वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्ध ढाक्यात सेहवागने १७५ रनची खेळी केली. तर २००३ सालच्या वर्ल्ड कपमध्ये सचिनने नामिबियाविरुद्ध १५२ रन केले होते. वनडेमध्ये पहिलं द्विशतक करणाऱ्या सचिनचा हा वर्ल्ड कपमधला सर्वाधिक स्कोअर आहे.


रोहित शर्मानं आत्तापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये रेकॉर्ड ७ वेळा १५० पेक्षा जास्त रन केले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर ३ द्विशतकं आहेत. रोहितचा वनडेमधला सर्वाधिक स्कोअर २६४ रन आहे. वनडेमध्ये सर्वाधिक स्कोअर आणि सर्वाधिक द्विशतकाचा विक्रम सध्या रोहितच्या नावावर आहे.


रोहितच्या नावावर हा विश्वविक्रम असला तरी वर्ल्ड कपमध्ये त्याचा सर्वाधिक स्कोअर १३७ रन आहे. २०१५ वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्ध रोहतिने मेलबर्नमध्ये ही खेळी केली होती.


विराट कोहलीच्या नावावर वर्ल्ड कपमध्ये २ शतकांचा समावेश आहे. पाकिस्तानविरुद्ध २०१५ वर्ल्ड कपमध्ये विराटने १०७ रनची खेळी केली होती. हा विराटचा वर्ल्ड कपमधला सर्वाधिक स्कोअर आहे. विराटने वनडे क्रिकेटमध्ये ४ वेळा १५० पेक्षा जास्त रन केल्या आहेत. विराटचा वनडेमधला सर्वाधिक स्कोअर १८३ रन आहे.


वर्ल्ड कपमधली द्विशतकं


वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडचा मार्टिन गप्टील आणि वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलने द्विशतकं केली आहेत. ही दोन्ही द्विशतकं २०१५ वर्ल्ड कपमध्ये झाली आहेत. गप्टीलने वेस्ट इंडिजविरुद्ध वेलिंग्टनमध्ये नाबाद २३७ रनची खेळी केली होती. तर गेलने झिम्बाब्वेविरुद्ध कॅनबेरामध्ये २१५ रन केले होते.