World Cup 2019 : टीम इंडियाचा सामना पाहण्यासाठी दोन खास मराठमोळे मुंबईकर
वर्ल्ड कप २०१९च्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाच्या बॉलरनी भेदक बॉलिंग केली.
साऊथम्पटन : वर्ल्ड कप २०१९च्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाच्या बॉलरनी भेदक बॉलिंग केली. यामुळे दक्षिण आफ्रिकेला ५० ओव्हरमध्ये २२७/९ एवढ्याच स्कोअरपर्यंत मजल मारता आली. युझवेंद्र चहलच्या बॉलिंगपुढे दक्षिण आफ्रिकेच्या बॅट्समननी लोटांगण घातलं. युझवेंद्र चहलने दक्षिण आफ्रिकेच्या सर्वाधिक ४ विकेट घेतल्या.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेची ही मॅच पाहण्यासाठी सचिन तेंडुलकर आणि अजिंक्य रहाणे पोहोचले होते. अजिंक्य रहाणेने सचिनसोबतचा हा फोटो त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. माझ्या आदर्शाला भेटणं हे नेहमीच खास असतं, असं ट्विट अजिंक्य रहाणेने केलं आहे.
अजिंक्य रहाणे हा सध्या इंग्लंडमध्ये हॅम्पशायरकडून काऊंटी क्रिकेट खेळत आहे. तर सचिन तेंडुलकर वर्ल्ड कपमध्ये कॉमेंट्री करत आहे.
या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराहने सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेला दोन धक्के दिले, तर मधल्या ओव्हरमध्ये चहलने ठराविक अंतराने दक्षिण आफ्रिकेच्या विकेट घेतल्या.
युझवेंद्र चहलने १० ओव्हरमध्ये ५१ रन देऊन सर्वाधिक ४ विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमारला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. भुवनेश्वर कुमारने शेवटच्या ओव्हरमध्ये २ विकेट घेतल्या. कुलदीप यादवला १ विकेट घेण्यात यश आलं.
दक्षिण आफ्रिकेकडून क्रिस मॉरिसने ३४ बॉलमध्ये सर्वाधिक ४२ रन केल्या, तर नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या कागिसो रबाडाने ३५ बॉलमध्ये नाबाद ३१ रन केले. मॉरिस आणि रबाडा यांच्यामध्ये ६६ रनची पार्टनरशीप झाली.