लंडन : २०१९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंडने ऐतिहासिक कामगिरी केली. पहिल्यांदाच एखाद्या वर्ल्ड कपची फायनल आणि सुपर ओव्हर टाय झाली. अखेर इंग्लंडने न्यूझीलंडपेक्षा जास्त बाऊंड्रीज मारल्यामुळे त्यांना विजेता घोषित करण्यात आलं. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन याला मॅन ऑफ द टुर्नामेंट देऊन गौरवण्यात आलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केन विलियमसनला हा पुरस्कार दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा पुरस्कार देताना सचिन विलियमसनला म्हणाला, 'तुझ्या खेळाचं सगळ्यांनी कौतुक केलं. तुझा वर्ल्ड कप शानदार राहिला.' यानंतर १०० एमबीशी बोलतानाही सचिनने विलियमसनची स्तुती केली. 'विलियमसनचा शांत राहण्याचा स्वभाव ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचं मानसिक संतुलन ढासळत नाही. त्याला वर्ल्ड कप जिंकता आला नाही, हे दुर्भाग्य आहे. पण वर्ल्ड कप न जिंकल्याचं दु:ख त्याच्या चेहऱ्यावर दिसलं नाही,' अशी प्रतिक्रिया सचिनने दिली.


'विलियमसन खेळाला वेगळ्या दृष्टीकोनातून बघतो. कमी स्कोअरचा बचाव करताना त्याने लावलेली फिल्डिंग आणि बॉलिंगमधले बदलाव उत्कृष्ट असतात. सेमी फायनलमध्ये जडेजा मोठे शॉट मारत होता, तेव्हादेखील केन शांत होता. शेवटी परिणाम त्यांच्या बाजूने लागला,' असं वक्तव्य सचिनने केलं.


केन विलियमसनने या वर्ल्ड कपमध्ये एकूण ५७८ रन केले. सचिनने त्याला वर्ल्ड कपच्या आपल्या ड्रीम टीममध्येही निवडलं होतं.