नॉटिंगहम : यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये इंडिजविरुद्धच्या पहिल्याच मॅचमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये जोरदार पुनरागमन केलं. हा सामना पाकिस्तानने १४ रननी जिंकला. लागोपाठ ११ पराभवानंतर पाकिस्तानला हा विजय मिळला. या विजयानंतर भारताची टेनिसपटू आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकची बायको सानिया मिर्झाने पाकिस्तानच्या टीमचं अभिनंदन केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोरदार पुनरागमन केल्याबद्दल पाकिस्तानच्या टीमचं अभिनंदन. पाकिस्तानची टीम ही नेहमीच अनपेक्षित कामगिरी करते. यामुळे क्रिकेट वर्ल्ड कप आणखी मनोरंजक झाला आहे, असं ट्विट सानिया मिर्झाने केलं आहे.



सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये संधी देण्यात आली नव्हती. पण इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये शोएब मलिकला संधी देण्यात आली. बॅटिंग करताना शोएब मलिकला ८ बॉलमध्ये ८ रनच करता आल्या. पण बॉलिंगमध्ये त्याने बेन स्टोक्सची महत्त्वाची विकेट घेतली.


या मॅचमध्ये इंग्लंडने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर बॅटिंगला आलेल्या पाकिस्तानने ५० ओव्हरमध्ये ३४८ रन केले. पाकिस्तानने ठेवलेल्या ३४९ रनचा पाठलाग करताना इंग्लंडला ५० ओव्हरमध्ये ३३४/९ एवढीच मजल मारता आली.


यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आपली पहिलीच मॅच खेळताना पाकिस्तानचा वेस्ट इंडिजविरुद्ध १०५ रनवर ऑल आऊट झाला होता. यानंतर पाकिस्तानच्या टीमवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती.