World Cup 2019 : पाकिस्तानच्या पराभवानंतर सानिया मिर्झाचं ट्रोलर्सना प्रत्युत्तर
वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारली आहे.
मॅनचेस्टर : वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. या मॅचमध्ये भारताचा ८९ रननी विजय झाला आहे. याचबरोबर वर्ल्ड कपमधले पाकिस्तानविरुद्धचे सगळे सामने जिंकण्याचा भारताचा रेकॉर्ड कायम आहे. आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात ७ मॅच झाल्या, या सगळ्या ७ मॅचमध्ये भारताचा विजय झाला.
भारताविरुद्धच्या या पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी भारताची टेनिसपटू आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक याची बायको सानिया मिर्झावर निशाणा साधला. भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या मॅचच्या आधीच्या दिवशी सानिया मिर्झा पाकिस्तानच्या खेळाडूंना घेऊन हॉटेलमध्ये गेली. पाकिस्तानी खेळाडूंचं लक्ष विचलित करण्यासाठी सानियाने असं केल्याचा आरोप पाकिस्तानी यूजर्सनी केला.
पाकिस्तानी यूजर्सनी केलेल्या या टीकेला सानिया मिर्झाने प्रत्युत्तर दिलं आहे. 'तुम्ही आम्हाला न विचारता हा व्हिडिओ काढलात. आमच्यासोबत लहान मुलगा असतानाही वैयक्तिक आयुष्याचा मान तुम्ही ठेवला नाहीत? आणि आता हा बकवास करत आहात. तुमच्या माहितीसाठी, हॉटेलमध्ये आम्ही जेवलो आणि मॅचमध्ये पराभव झाला तरी तुम्हाला जेवायची परवानगी असते. मुर्खांचा समूह. पुढच्या वेळी चांगला विषय शोधा,' असं ट्विट सानिया मिर्झाने केलं.
भारताविरुद्धच्या मॅचमध्ये शोएब मलिक पहिल्याच बॉलला आऊट झाला. यानंतर शोएब मलिकवरही पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी जोरदार टीका केली आहे. तसंच शोएब मलिकला टीममधून डच्चू देण्याची मागणीही करण्यात येत आहे.