मुंबई : वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. यामुळे भारताचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं. वर्ल्ड कपमधल्या या कामगिरीनंतर आता टीम इंडियाच्या प्रशिक्षकांवर टांगती तलवार आहे. प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह अन्य कोचिंग स्टाफचा करार ४५ दिवसांनी वाढवला जाऊ शकतो. पण संजय बांगर यांचं पद मात्र धोक्यात आलं आहे. संजय बांगर यांनी त्यांचं काम आणखी चोख करायला पाहिजे होतं, असं बीसीसीआयमधल्या एका गटाचं म्हणणं आहे. संजय बांगर टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक आणि बॅटिंग प्रशिक्षकही आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिंग प्रशिक्षक भरत अरुण आणि फिल्डिंग प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी मागच्या दीड वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पण संजय बांगर यांच्यावर जबाबदारी असणारी बॅटिंग अनेकवेळा संघर्ष करताना दिसली. चौथ्या क्रमांकावर एका मजबूत बॅट्समनची निवड न होणंही बीसीसीआयला पटलेलं नाही.


बीसीसीआयचा एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला, 'हा अडचणीचा विषय राहिला. आम्ही खेळाडूंना पूर्ण समर्थन देत आहोत. टीमने फक्त एका मॅचमध्ये खराब कामगिरी केली. पण प्रशिक्षकांची प्रक्रिया आणि निर्णयाची चौकशी केली जाईल. यानंतर त्यांच्या भविष्याबाबत निर्णय घेतला जाईल.'


विजय शंकरला दुखापत झाल्यामुळे तो वर्ल्ड कपमधून बाहेर झाला. त्याआधी शंकर पूर्णपणे फिट असल्याचं वक्तव्य बांगर यांनी केलं होतं. हेदेखील बीसीसीआयला पटलेलं नाही.


टीम इंडियाचे मॅनेजर सुनील सुब्रमण्यम यांच्या कामगिरीवरही बीसीसीआयचे अधिकारी नाराज आहेत. 'टीम मॅनेजरसोबत बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या आचरण आणि दृष्टीकोनामुळे निराशा हाती आली. आपल्या मित्रांना तिकीट आणि पास देणं आणि आपल्या टोपीची स्थिती नीट ठेवणं, हीच त्यांची प्राथमिकता दिसत होती,' अशी टीका बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने केली. याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही सुब्रमण्यम यांच्या वर्तवणुकीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.