मॅन्चेस्टर : यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भारत-पाकिस्तान सामना १६ जूनला खेळवण्यात येणार आहे. या मॅचआधीच पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याने रडीचा डाव खेळायला सुरुवात केली आहे. टीम इंडियाला अनुकूल अशा खेळपट्ट्या आयसीसीने बनवल्याचा आरोप सरफराज अहमदने केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड कपमध्ये सरफराज पाकिस्तानच्या टीमला मिळणाऱ्या खेळपट्ट्यांवर नाराज आहे. आम्हाला मिळणाऱ्या खेळपट्ट्या खेळासाठी अनुकूल नसतात, असं सरफराजचं म्हणणं आहे. तसंच भारताला आयसीसी स्पर्धांमध्ये प्रत्येकवेळी बॅट्समन आणि स्पिनरना मदत मिळणाऱ्या खेळपट्ट्या दिल्या जातात. अशा खेळपट्ट्या आशियाई टीमना अनुकूल असतात, अशी तक्रार सरफराजने केली आहे. टीम इंडियाने या वर्ल्ड कपमध्ये पहिले दक्षिण आफ्रिका आणि मग ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. तर न्यूझीलंडविरुद्धची मॅच पावसामुळे रद्द झाली.


ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये पाकिस्तानचा ४१ रननी पराभव झाला. या मॅचमधल्या खेळपट्टीवरही सरफराजने आक्षेप घेतले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फास्ट बॉलरना मदत मिळणाऱ्या उसळी जास्त असणाऱ्या खेळपट्टीवर खेळायला लागल्याचं सरफराजचं म्हणणं आहे.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिरने ५ विकेट घेतल्या. यामुळे कांगारुंचा ४९ ओव्हरमध्ये ३०७ रनवर ऑल आऊट झाला. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान ४५.४ ओव्हरमध्ये २६६ रनवर ऑल आऊट झाली. याआधी वेस्ट इंडिजविरुद्ध उसळी मारणाऱ्या विकेटवर पाकिस्तानचा १०५ रनवर ऑलआऊट झाला होता.


यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने ४ पैकी १ सामना जिंकला, तर २ गमावले आहेत आणि १ सामना पावसामुळे रद्द झाला आहे. पाकिस्तानच्या खात्यात सध्या ३ पॉईंट असल्यामुळे ते आठव्या क्रमांकावर आहेत. तर टीम इंडियाने या वर्ल्ड कपमध्ये ३ पैकी २ मॅच जिंकल्या आहेत, तर १ मॅच पावसामुळे रद्द झाली आहे. ५ पॉईंट्ससह टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे.