लंडन : यंदाच्या वर्ल्ड कपचा शेवटचा टप्पा जसा जवळ येत आहे, तशी सेमी फायनलची रेसही रोमांचक होत चालली आहे. ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडचा ६४ रननी पराभव केला. याचबरोबर ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरली आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवामुळे इंग्लंडचा सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यालाच आव्हान निर्माण झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाने ७ मॅचपैकी ६ मॅचमध्ये विजय मिळवला, तर भारताविरुद्धच्या फक्त एकच मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला. १२ पॉईंट्ससह ऑस्ट्रेलियाची टीम पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये ११ पॉईंट्ससह न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडने ६ पैकी ५ मॅचमध्ये विजय मिळवला, तर त्यांची एक मॅच पावसामुळे रद्द झाली आहे. पॉईंट्स टेबलमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने ५ पैकी ४ मॅचमध्ये विजय मिळवला तर एक मॅच पावसामुळे रद्द झाली. भारताच्या खात्यात ९ पॉईंट्स आहेत.


सेमी फायनलचं गणित 


या आकडेवारीवर नजर टाकली तर न्यूझीलंड आणि भारत या दोन्ही टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील असं दिसत आहे. सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी न्यूझीलंडला त्यांच्या उरलेल्या ३ मॅचपैकी १ मॅच जिंकायची आहे. तर भारताला उरलेल्या ४ मॅचपैकी २ मॅच जिंकायच्या आहेत. भारताच्या उरलेल्या मॅच या आता वेस्ट इंडिज, इंग्लंड, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध आहेत. तर न्यूझीलंडच्या उरलेल्या मॅच पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्याविरुद्ध आहेत.


ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड या तीन टीम सेमी फायनलसाठी जवळपास निश्चित असल्या तरी चौथ्या टीमसाठी मात्र आता जोरदार रस्सीखेच होताना दिसत आहे. सेमी फायनलच्या रेसमध्ये इंग्लंड, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान या टीम आहेत.


इंग्लंड


इंग्लंडने वर्ल्ड कपमध्ये ७ पैकी ४ मॅच जिंकल्या, तर ३ मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. यामुळे त्यांच्या खात्यात ८ पॉईंट्स आहेत. सेमी फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर आता इंग्लंडला त्यांच्या उरलेल्या दोन्ही मॅचमध्ये विजय मिळवावा लागणार आहे. इंग्लंडच्या उरलेल्या मॅच भारत आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध आहेत. यातल्या एका मॅचमध्ये जरी त्यांचा पराभव झाला तर मात्र त्यांना सेमी फायनल प्रवेशासाठी दुसऱ्या टीमच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे.


बांगलादेश


पॉईंट्स टेबलमध्ये बांगलादेश पाचव्या क्रमांकावर आहे. बांगलादेशचा ७ पैकी ३ मॅचमध्ये विजय झाला तर ३ मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आणि त्यांची एक मॅच पावसामुळे रद्द झाली. यामुळे बांगलादेशकडे ७ पॉईंट्स आहेत. बांगलादेशच्या उरलेल्या मॅच या भारत आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध आहेत. सेमी फायनलचं आव्हान कायम ठेवण्यासाठी बांगलादेशला या दोन्ही मॅच जिंकाव्या लागणार आहेत. या दोन्ही मॅच जिंकल्यास बांगलादेशच्या खात्यात ११ पॉईंट्स होतील. बांगलादेशचे ११ पॉईंट्स झाले तरी ते सेमी फायनल प्रवेशासाठी इतर टीमच्या कामगिरीवर अवलंबून असतील.


श्रीलंका


पॉईंट्स टेबलमध्ये श्रीलंका ६ पॉईंट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेने खेळलेल्या ६ मॅचपैकी २ मॅचमध्ये त्यांचा विजय झाला, तर २ मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. लंकेच्या उरलेल्या २ मॅच पावसामुळे रद्द झाल्या. श्रीलंकेने त्यांच्या उरलेल्या तिन्ही मॅच जिंकल्या तर ते १२ पॉईंट्ससह सेमी फायनलमध्ये पोहोचतील. पण या ३ पैकी २ मॅच श्रीलंकेला जिंकता आल्या तर त्यांचा सेमी फायनल प्रवेश इतर टीमवर अवलंबून असेल. श्रीलंकेच्या उरलेल्या मॅच या दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि भारत यांच्याविरुद्ध आहेत.


पाकिस्तान


यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये फारशी चांगली कामगिरी न करणाऱ्या पाकिस्तानलाही वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. पॉईंट्स टेबलमध्ये पाकिस्तान ५ पॉईंट्स सातव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानने ६ पैकी २ मॅच जिंकल्या तर ३ मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. पाकिस्तानची एक मॅच पावसामुळे रद्द झाली. सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानला उरलेल्या तिन्ही मॅच जिंकाव्या लागणार आहेत. तिन्ही मॅच जिंकल्यास पाकिस्तानच्या खात्यात ११ पॉईंट्स होतील. तरीही पाकिस्तानला सेमी फायनल प्रवेशासाठी इतर टीमवर अवलंबून राहावं लागणार आहे. पाकिस्तानच्या उरलेल्या मॅच या न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध आहेत.