लंडन : वर्ल्ड कपमध्ये गुरुवारी टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. या मॅचमध्ये दुखापत झालेला शिखर धवन खेळणार नाही. रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये शतकी खेळी करताना शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. यामुळे डॉक्टरांनी शिखर धवनला १०-१२ दिवस क्रिकेटपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. तरीही धवन टीम इंडियासोबत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिखर धवनच्या अंगठ्याचं मंगळवारी स्कॅनिंग करण्यात आलं. यामध्ये त्याच्या अंगठ्याला हेयरलाईन फ्रॅक्चर असल्याचं समोर आलं. शिखर धवनच्या खेळण्याबाबतचा शेवटचा निर्णय १०-१२ दिवसांमध्ये होईल, असं टीम इंडियाचे बॅटिंग प्रशिक्षक संजय बांगर यांनी सांगितलं. यामुळे धवन न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅच खेळणार नाही हे निश्चित झालं आहे.


शिखर धवन पुढचे १०-१२ दिवस विश्रांती करणार असला तरी तो टीम इंडियाच्या सरावासाठी मैदानात पोहोचला. न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचच्या एक दिवस आधी टीम इंडियाने नॉटिंगहममध्ये सराव केला. यावेळी धवन त्याच्या साथीदारांसोबत दिसला. यावेळी शिखर धवनने सराव केला नाही, पण खेळाडूंना त्याने बॉल उचलून दिला.



शिखर धवनला कव्हर म्हणून ऋषभ पंत इंग्लंडला रवाना होणार आहे. पण पंतचा अंतिम १५ खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. शिखर धवनच्या दुखापतीबद्दल अंतिम निर्णय झाल्यावरच पंतबाबत निर्णय होईल.