लॉर्ड्स : यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेची कामगिरी निराशाजनक झाली. आतापर्यंत झालेल्या मॅचपैकी फक्त अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला. तर ५ मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आणि १ मॅच पावसामुळे रद्द झाली. पॉईंट्स टेबलमध्ये ३ पॉईंट्ससह दक्षिण आफ्रिका नवव्या क्रमांकावर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ४९ रननी पराभव झाला. या पराभवाबरोबरच दक्षिण आफ्रिकेचं वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचण्याचं स्वप्न भंगलं आहे. वर्ल्ड कपमधल्या खराब कामगिरीनंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डुप्लेसिसने आयपीएलवर खापर फोडलं आहे. 


काय म्हणाला फॅफ डुप्लेसिस?


'मी आणि टीम मॅनेजमेंटने वेगवान बॉलर खगिसो रबाडाला आयपीएल खेळण्यापासून रोखण्याचे अनेक प्रयत्न केले. वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर रबाडाला फीट राहण्यासाठीची शिफारस करण्यात आली होती', असे फॅफ म्हणाला.


खगिसो रबाडाला वर्ल्ड कप स्पर्धत पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये विशेष कामगिरी करता आली नाही. त्याने १० ओव्हरमध्ये एकही विकेट न घेता ६५ रन दिल्या.


खगिसो रबाडाने यावर्षात आतापर्यंत एकूण ३०३ ओव्हर टाकल्या आहेत. यात आयपीएलमधील काही ओव्हरचा देखील समावेश आहे. खगिसो रबाडा २०१९ च्या आयपीएल स्पर्धेत दिल्लीच्या टीमकडून खेळत होता. यावेळी त्याने १२ मॅचमध्ये  २५ विकेट घेतल्या होत्या.


आयपीएलमध्ये दुखापती झाल्याने दक्षिण आफ्रिका टीम मॅनेजमेंटने खगिसो रबाडाला माघारी बोलावून घेतले. आयपीएल सुरु होण्याआधी फॅफने हा मुद्दा उपस्थित केला होता. खगिसो क्रिकेटच्या तिन्ही फॉरमेट मध्ये खेळतो. त्यामुळे रबाडाला विश्रांती मिळत नाही, असा मुद्दा फॅफने उपस्थित केला होता.


दुखापत आणि कामगिरी यासाठी आयपीएल स्पर्धेला गृहीत धरण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी टीम इंडियाचे ट्रेनर शंकर बसू यांनी आयपीएलला जबाबदार धरले होते. आयपीएलच्या वेळांचा खेळाडूंच्या फिटनेसवर परिणाम होतो, असा आरोप बसू यांनी पत्रकार परिषदेत केला होता.