साऊथम्पटन : २०१९ क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात झाली असली तरी टीम इंडियाचा पहिला सामना बुधवारी खेळवण्यात येणार आहे. भारत वर्ल्ड कपमधली अशी टीम आहे ज्यांनी वेस्ट इंडिजची सद्दी संपुष्टात आणली. मायभूमीत वर्ल्ड कप जिंकणारी टीम इंडिया पहिली ठरली. नेहमीप्रमाणेच यावेळीही विराटची सेना वर्ल्ड कप जिंकणाऱ्यांच्या दावेदारांमध्ये आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडिया वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियानंतर वेस्ट इंडिजप्रमाणे सर्वाधिक दोनवेळा जगज्जेता ठरली. भारताला सुरुवातीच्या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. लिंबूटिंबू टीम अशी भारताची प्रतीमा होती. ती प्रतीमा १९८३ वर्ल्ड कपमध्ये बदलली. १९८३मध्ये कोणाच्या ध्यानीमनी नसताना भारतानं अशी काही कमाल केली की त्यांनी थेट दोन वेळेच्या विश्वविजेत्या विडिंजला पराभूत करत जगज्जेतेपद पटकावलं.


१९८३ वर्ल्ड कपात कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली भारतानं प्रथमच वर्ल्ड कपवर नाव कोरलं. त्यानंतर तब्बल २८ वर्षांनी म्हणजे २०११मध्ये भारतानं दुसरा वर्ल्ड कप पटकावला. हा वर्ल्ड कप भारतात आयोजित केला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतानं मायभूमीत जगज्जेपद पटकावण्याचा पराक्रम केला. तर २००३ मध्ये भारत उपविजेता ठरला.


विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारत प्रथमच वर्ल्ड कपच्या रणांगणात उतरत आहे. आता विराट सेना कशी कामगिरी करते याकडेच साऱ्यांचं लक्ष लागलंय.


या टीममधील ८ जण प्रथमच वर्ल्ड कपाच्या या महायुद्धात सहभागी होणार आहेत.


भारतीय टीमवर नजर टाकल्यास रोहित शर्मा आणि शिखर धवनवर भारताला मजबूत सलामी देण्याची जबाबदारी असेल. विराट, धोनी, के.एल. राहुल, केदार आणि हार्दिकवर भारताच्या मधल्या फळीची भिस्त असेल.


युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या जोडगोळीला फिरकीची जादू दाखवावीच लागेल. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांच्यावर इंग्लंडच्या खेळपट्टीवर आपल्या वेगवान माऱ्याचा जलवा दाखवावा लागेल. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जाडेजा हे दोन अष्टपैलू आपल्या ताफ्यात आहेत.


चौथ्या स्थानावर कोणावर खेळवायचं याचा निर्णय गेल्या काही वर्षात तरी टीम व्यवस्थापनाला घेता आला नाही. अस्थिर असलेल्या चौथ्या क्रमांकासाठी विजय शंकर पर्याय म्हणून संघात आहे. तर तळाला निर्णायक क्षणी भारतीय बॅट्समन कच खातात हे भारताचे कच्चे दुवे आहेत.


दरम्यान गेल्या वर्षी भारतानं उत्तम कामगिरी केली होती. दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरिज भारताने जिंकल्या. तर आशियाई कपही पटकाला. याखेरीज कधी नव्हे ते भारताची बॉलिंग ताकदवान वाटत आहे. इंग्लंडमध्ये भारतानं पहिला वर्ल्ड कप जिंकला होता. यामुळे पुन्हा एकदा भारतीयांना लॉर्ड्सवर भारतीय कर्णधारानं विजयाचा चषक उंचावताना पाहायचं आहे. आता विराट सेना भारताला हा ऐतिहासक क्षण अनुभवायला देते का याचीची साऱ्या देशवासियांना प्रतीक्षा आहे.