लॉर्ड्स : वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडचा ऐतिहासिक विजय झाला. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातला हा सामना टाय झाल्यामुळे, सुपर ओव्हर खेळवण्यात आली, पण सुपर ओव्हरही टाय झाली. अखेर इंग्लंडने न्यूझीलंडपेक्षा जास्त बाऊंड्री मारल्यामुळे इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं. क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल टाय होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसंच वर्ल्ड कप फायनलमध्ये सुपर ओव्हरही पहिल्यांदाच खेळवली गेली. त्यामुळे या मॅचची इतिहासात नोंद झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये अंपायर असलेल्या श्रीलंकेच्या कुमार धर्मसेना यांनीही अनोखा विक्रम केला आहे. वर्ल्ड कप फायनलमध्ये एक खेळाडू आणि एक अंपायर म्हणून सहभागी होणारे कुमार धर्मसेना हे पहिलेच क्रिकेटपटू आहेत. धर्मसेना हे १९९६ सालचा वर्ल्ड कप जिंकलेल्या श्रीलंकेच्या टीमचे सदस्य होते.


वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळाडू आणि अंपायर म्हणून भूमिका बजावणारे धर्मसेना हे एकमेव खेळाडू बनले आहेत.   


खराब अंपायरिंग


या वर्ल्ड कपमध्ये केलेल्या खराब अंपायरिंगमुळे धर्मसेना चर्चेत राहिले. फायनल मॅचमध्ये धर्मसेना यांनी मार्टिन गप्टील याला एलबीडबल्यू आऊट दिले, पण गप्टीलने रिव्ह्यू घेतल्यानंतर तो नॉट आऊट असल्याचं समोर आलं. यानंतर याच मॅचच्या मोक्याच्या क्षणी धर्मसेना आणि दुसरे अंपायर मरे एरॅसमस यांनी ओव्हर थ्रोच्या ५ रन देण्याऐवजी ६ रन दिल्या. याचा परिणाम मॅचच्या निकालावर लागला.


इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या सेमी फायनलमध्येही धर्मसेना यांनी इंग्लंडच्या जेसन रॉयला चुकीच्या पद्धतीने आऊट दिलं. यानंतर जेसन रॉय आणि धर्मसेना यांच्यात मैदानातच वाद झाला होता.