साऊथम्पटन : वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने अफगाणिस्तानचा ११ रननी पराभव केला. पण या मॅचमध्ये पाकिस्तानी अंपायर अलीम दार यांच्याशी मैदानात घेतलेला पंगा कर्णधार विराट कोहलीला महागात पडला आहे. शनिवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाने रिव्ह्यू गमावला तेव्हा विराट कोहलीने अंपायरजवळ जाऊन वाद घातला. आक्रमक अपील केल्याप्रकरणी आयसीसीने विराटला शिक्षा सुनावली आहे. विराट कोहलीच्या मॅच फीमधली २५ टक्के रक्कम कापण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीने आचार संहितेची लेव्हल एक तोडल्याप्रकरणी विराटला दोषी ठरवलं आहे. विराटने आयसीसी आचार संहिता धारा २.१चं उल्लंघन केलं आहे. आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये प्रमाणापेक्षा जास्त अपील संबंधित ही धारा आहे. ही आचार संहिता भंग केल्याप्रकरणी कमीतकमी शिक्षा अधिकाऱ्याची फटकार तर जास्तीत जास्त शिक्षा खेळाडूच्या मॅच फीची ५० टक्के रक्कम कापणं आणि एक किंवा दोन डिमेरीट पॉईंट्स देणं एवढी असते.



आयसीसीचे मॅच रेफ्री क्रिस ब्रॉड यांनी लावलेली ही शिक्षा विराटने स्वीकार केली आहे. त्यामुळे याप्रकरणाच्या अधिकृत सुनावणीची गरज पडली नाही. यामुळे विराटच्या खात्यात १ डिमेरीट पॉईंट जोडण्यात आला. यामुळे विराटचे आता २ डिमेरीट पॉईंट्स आहेत. याआधी १५ जानेवारी २०१८ दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रिटोरिया टेस्टमध्ये विराटला एक डिमेरीट पॉईंट मिळाला होता. एखाद्या खेळाडूचे २४ महिन्यांमध्ये ४ किंवा त्यापेक्षा जास्त डिमेरीट पॉईंट्स झाले तर त्याचं निलंबन करण्यात येतं. आयसीसीने सप्टेंबर २०१६ पासून डिमेरीट पॉईंट्स द्यायला सुरुवात केली.


अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये २९व्या ओव्हरला जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगच्या पहिल्या बॉलवर रहमत शाहच्या एलबीडब्ल्यूसाठी अपील करण्यात आलं. अंपायरने नॉट आऊट दिल्यानंतर विराटने रिव्ह्यू घेतला, पण रिव्ह्यूमध्येही शाह नॉट आऊट होता. यामुळे विराट आक्रमक झाला.