मॅनचेस्टर : २०१९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा मुकाबला न्यूझीलंडशी होणार आहे. मंगळवार ९ जुलैरोजी या दोन्ही टीम एकमेकांना भिडतील. या मॅचमध्ये पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती पाहायला मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

११ वर्षांपूर्वी म्हणजेच २००८ साली भारत आणि न्यूझीलंड यांच्या टीम अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये खेळल्या होत्या. त्यावेळीही भारताचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन होता. त्या मॅचमध्ये विराटने केन विलियमसनला आऊट केलं. भारताने ती मॅच ३ विकेटने जिंकली आणि फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून वर्ल्ड कपही जिंकला.


'तो सामना माझ्या लक्षात आहे, केनच्याही लक्षात असेल. मी त्याला सामन्यादरम्यान आठवण करुन देईन. ११ वर्षांनी आम्ही आमचे संघ घेऊन एकमेकांसमोर उभे राहणार आहोत. ही खरंच मोठी गोष्ट आहे. असं कधी घडेल असं वाटलं नव्हतं मात्र हे घडलं आहे', अशी प्रतिक्रिया विराटने सेमी फायनलआधी दिली.


अंडर-१९ च्या त्या मॅचमध्ये केवळ हे दोन कर्णधारच नव्हे तर रवींद्र जडेजा, ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदीदेखील खेळले होते. अंडर-१९ च्या या मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाला होता. त्यामुळे आताही भारतच बाजी मारेल, अशी क्रिकेट चाहत्यांची आशा आहे.