बर्मिंघम : यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिला पराभव झाला. इंग्लडने भारताविरुद्ध ३१ रननी विजय मिळवला. या पराभवानंतरही भारताला फारशी चिंता करण्याची गरज नाही, कारण सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला २ पैकी १ सामना जिंकावा लागणार आहे. भारताचे उरलेले २ सामने बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली हे जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. इंग्लंडविरुद्ध रोहितने शानदार शतक केलं. या वर्ल्ड कपमधलं रोहितचं हे तिसरं शतक होतं. तर विराटने अर्धशतकी खेळी केली. या वर्ल्ड कपमधलं विराटचं हे लागोपाठ ५वं अर्धशतक होतं. हे दोन्ही खेळाडू फॉर्ममध्ये असले तरी भारताला धोनी आणि केदार जाधवच्या फॉर्मबद्दल चिंता आहे.


इंग्लंडविरुद्धच्या मॅचवेळी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना धोनी आणि केदार जाधवने आक्रमक खेळी केली नाही. या दोघांमध्ये ३१ बॉलमध्ये ३९ रनची पार्टनरशीप झाली. शेवटच्या काही ओव्हरमध्ये फोर आणि सिक्सची गरज असतानाही केदार आणि धोनी एक-एक रन काढत होते. या दोघांनी ३१ बॉलच्याच्या पार्टनरशीपमध्ये ७ बॉलला एकही रन काढली नाही. तर २० एक रन, ३ फोर आणि १ सिक्स लगावली.


धोनी आणि केदार जाधव या दोघांच्या खेळीविषयी कर्णधार विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्हाला बसून या गोष्टीवर बोलावं लागेल. या वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक टीम एक-दोन मॅच हरली आहे. इंग्लंडची टीम आमच्यापेक्षा चांगली खेळली, हे मानावं लागेल. आम्हीही चांगले खेळलो, पण त्यांनी खेळाचा शेवट चांगला केला. आम्ही व्यावसायिक क्रिकेटपटू आहोत. या पराभवातून शिकू,' असं विराट म्हणाला.


'पांड्या आणि पंत खेळत असताना आम्हाला विजयाची आशा होती, पण विकेट जात राहिल्या आणि परिस्थिती खराब झाली'. केदार आणि धोनी जलद रन का काढू शकले नाहीत हा प्रश्न विचारला असता कोहली म्हणाला, 'क्रिजवर असणाऱ्या दोन खेळाडूंमधली ही गोष्ट आहे. धोनी शॉट मारण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला जमत नव्हतं. इंग्लंडनेही चांगली बॉलिंग केली, यामुळे शॉट मारणं कठीण झालं. आम्हाला याबद्दल बोलावं लागेल, ज्यामुळे पुढच्या मॅचमध्ये सुधारणा होईल, असं वक्तव्य कोहलीने केलं.


इंग्लंडविरुद्ध धोनीने ३१ बॉलमध्ये ४२ रन केले, तर केदार जाधवला १३ बॉलमध्ये १२ रन करता आले. याआधी अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्येही धोनी आणि केदार जाधवच्या संथ खेळीवर टीका झाली होती.