World Cup 2019 : ऋषभ पंतच्या बेजबाबदार शॉटनंतर कोहली शास्त्रीला नेमकं काय म्हणाला?
वर्ल्ड कप जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न भंगलं आहे.
मॅनचेस्टर : वर्ल्ड कप जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न भंगलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा १८ रननी पराभव झाला. न्यूझीलंडने ठेवलेल्या २४० रनचा पाठलाग करताना टीम इंडिया ४९.३ ओव्हरमध्ये २२१ रनवर ऑल आऊट झाली. लक्षाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली प्रत्येकी १-१ रन करुन माघारी परतले. यानंतर लगेचच दिनेश कार्तिक २५ बॉलमध्ये ६ रन करुन माघारी परतला.
दिनेश कार्तिक आऊट झाला तेव्हा भारताची अवस्था २४/४ अशी होती. यानंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याने भारताच्या इनिंगला आकार द्यायला सुरुवात केली. पण पंत आणि पांड्या चुकीचे फटके मारून आऊट झाले. या दोघांनी प्रत्येकी ३२-३२ रन केले.
ऋषभ पंतची विकेट गेल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये बसलेला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली प्रशिक्षक रवी शास्त्रीकडे गेला आणि काहीतरी म्हणाला. यावेळी विराट कोहलीच्या चेहऱ्यावर संताप दिसत होता.
नेमका काय म्हणाला विराट?
रवी शास्त्रींकडे जाऊन आपण काय बोललो याचा खुलासा विराटने मॅचनंतरच्या पत्रकार परिषदेत केला आहे. 'नेमकं काय चाललं आहे? आता पुढची रणनिती काय असणार आहे? असे प्रश्न मी तेव्हा शास्त्रीला विचारले,' अशी प्रतिक्रिया विराटने दिली.
'खराब शॉट खेळलो'
'मला आणि रोहित शर्माला पडलेला बॉल हा उत्कृष्ट होता, पण टीममधल्या काही खेळाडूंनी खराब शॉट खेळले. ऋषभ पंतला त्याची चूक लक्षात आली,' असं वक्तव्य विराट कोहलीने केलं.