World Cup 2019 : चिमुरडीच्या प्रश्नाला उत्तर देणाऱ्या विराटचा व्हिडिओ व्हायरल
विराटचा मनं जिंकणारा अंदाज पाहायला मिळाला
नवी दिल्ली : क्रिकेट विश्वचषकामध्ये भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्हीं संघांमध्ये बहुप्रतिक्षित क्रिकेट सामना होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. युनिसेफच्या एका उपक्रमाअंतर्गत सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत विराटचा मनं जिंकणारा अंदाज पाहायला मिळाला.
'बीसीसीआय'च्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंबंधीचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये विराट नेमका आहे तरी कोण याविषयी माहिती देत एक लहानगा त्याची ओळख सर्व उपस्थितांना करुन देत आहे. मुख्य म्हणजे तो मुलगा स्वत:चा उल्लेख संघाचा माध्यम व्यवस्थापक अर्थात मीडिया मॅनेजर म्हणून करत आहे.
'हॅलो.... ', असं म्हणत मोठ्या प्रभावी अंदाजात एका दिवसासाठी मी मीडिया मॅनेजर असणार आहे असं तो म्हणताना विराटही त्याच्याक़डे मोठ्या कुतूहलाने पाहत आहे. त्या मुलाच्या आत्मविश्वासाचं विराटलाही कुतूहल वाटलं असणार यात शंका नाही. औपचारिक ओळख करुन दिल्यानंतर विराट आसनस्थ होतो आणि त्याला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली जाते.
विराटच्या चेहऱ्यावर असणारं हास्यच त्या क्षणाचं महत्त्व स्पष्ट करत असल्याचं कळत आहे. विराटची ओळख करुन दिल्यावर त्याने एका मुलीकडे माईक दिला. ज्यानंतर त्या मुलीने भारतीय संघाच्या कर्णधाराला एक सुरेख प्रश्न विचारला.
'विराट... मी नेहा... माझा प्रश्न असा आहेस की, तू उद्याच्या (रविवारच्या) समान्यासाठी उत्सुक आहेस?', असा प्रश्न तिने विचारला. तिच्या या प्रश्नाचं उत्तर देत विराटनेही सर्वांचं लक्ष वेधलं. 'नेहा.... हो. हा फार चांगला प्रश्न तू विचारला आहेस. आम्ही फारच उत्साही आहोत. ही एक चांगली संधी आहे', असं म्हणत तूसुद्धा हा सामना पाहण्यासाठी उत्सुक असशील असा आशावाद त्याने व्यक्त केला.
सध्याच्या घडीला कर्णधारपदी असणारा विराट आणि त्याचा एकंदर अंदाज पाहता तो प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनाही हेवा वाटेल असाच आहे. विश्वचषकाच्या या शर्यतीत आतापर्यंतच्या एकूण सहा सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघ पाच सामन्यांमध्ये विजयी ठरला असून, एक सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. परिणामी इंग्लंडविरोधात संघाची कामगिरी सातत्यपूर्ण राहते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.