World Cup 2019 : वर्ल्ड कपच्या नॉक-आऊट मॅचमधली विराटची खराब कामगिरी
वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला आहे.
मॅनचेस्टर : वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला आहे. यामुळे टीम इंडियाचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. न्यूझीलंडने ठेवलेल्या २४० रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा ४९.३ ओव्हरमध्ये २२१ रनवर ऑल आऊट झाला. यामुळे भारताने हा सामना १८ रननी गमावला.
न्यूझीलंडने ठेवलेलं आव्हान गाठताना टीम इंडियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली प्रत्येकी १-१ रन करुन आऊट झाले. वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिले तीन खेळाडू १-१ रन करून आऊट होण्याची ही पहिलीच घटना आहे. पण यामुळे विराट कोहलीच्या वर्ल्ड कपच्या नॉक-आऊट मॅचमधल्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
वर्ल्ड कपच्या ६ नॉक-आऊट मॅचमध्ये विराट कोहलीने १२.१६ ची सरासरी आणि ५६.१५ च्या स्ट्राईक रेटने फक्त ७२ रन केले आहेत. विराटने आतापर्यंत २०११, २०१५ आणि २०१९ वर्ल्ड कपमध्ये नॉक-आऊट मॅच खेळल्या आहेत.
२०१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध विराट ६ बॉलमध्ये १ रन करून आऊट झाला. तर २०१५ वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटला १३ बॉलमध्ये १ रन करता आली होती. याच वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये बांगलादेशविरुद्ध विराट ८ बॉलमध्ये ३ रन करून माघारी परतला. २०११ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध विराट ४९ बॉलमध्ये ३५ रन करून आऊट झाला. याच वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध विराटला २१ बॉलमध्ये ९ रन काढता आल्या, आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्वार्टर फायनलमध्ये विराट ३३ बॉलमध्ये २४ रन करून आऊट झाला.
२०११ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये विराटला वहाब रियाझने, २०१५ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये विराटला मिचेल जॉनसनने आणि २०१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये ट्रेन्ट बोल्टने विराटला माघारी धाडलं. हे तिघेही डावखुरे फास्ट बॉलर आहेत. तसंच २०१७ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्येही डावखुऱ्या मोहम्मद आमीरने विराटची विकेट घेतली होती.
'नॉक-आऊटमध्ये होत असलेल्या खराब कामगिरीमुळे मी निराश आहे. मोक्याच्या क्षणी टीमला गरज असताना मी अपयशी ठरत आहे,' अशी खंत विराट कोहलीने मॅचनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलून दाखवली.