मुंबई : २०१९ सालच्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये फारसे मोठे बदल करण्यात आले नसले, तरी काही खेळाडूंचा मात्र यामुळे भ्रमनिरास झाला आहे. अंबाती रायुडू आणि ऋषभ पंत या दोघांचीही निवड झालेली नाही. अंबाती रायुडूकडे टीम इंडियाच्या बॅटिंग क्रमवारीतला चौथ्या क्रमांकाचा खेळाडू म्हणून पाहिलं जात होतं. मागच्या वर्षभरामध्ये रायुडूला चौथ्या क्रमांकावरच खेळण्याची संधी देण्यात आली होती. पण न्यूझीलंड दौऱ्यानंतर अंबाती रायुडूचा फॉर्म ढासळला, यामुळे त्याला वर्ल्ड कपला मुकावं लागलं.


चौथ्या क्रमांकाची अडचण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१५ वर्ल्ड कपनंतर भारताने युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, मनिष पांडे, केएल राहुल, अंबाती रायुडू, धोनी, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, मनोज तिवारी, केदार जाधव, विराट कोहली, ऋषभ पंत या १२ खेळाडूंना संधी देण्यात आली. पण यातल्या एकालाही स्वत:चं चौथ्या क्रमांकावरचं स्थान पक्कं करता आलं नाही.


वर्ल्ड कपमध्ये दुसरा विकेट कीपर म्हणून ऋषभ पंतच्या नावाचीही चर्चा होती. पण निवड समितीने युवा पंतऐवजी दिनेश कार्तिकच्या अनुभवाला पसंती दिली. २१ वर्षांच्या ऋषभ पंतला आत्तापर्यंत खेळलेल्या ५ वनडे मॅचमध्ये चमकदार कामगिरी करता आली नाही. या ५ वनडेमध्ये पंतने फक्त ९३ रन केल्या आहेत. यामध्ये पंतचा सर्वाधिक स्कोअर ३६ रन आहे.


तर दुसरीकडे ३६ वर्षांच्या दिनेश कार्तिकने ९१ वनडे मॅचमध्ये १,७३८ रन केले आहेत. दिनेश कार्तिकचा सर्वाधिक स्कोअर ७९ रन आहे. दिनेश कार्तिक हा सध्या भारतीय टीममधल्या सगळ्यात वरिष्ठ खेळाडूपैकी एक आहे. कार्तिकने सप्टेंबर २००४ साली पहिली वनडे खेळली होती. यानंतर तीन महिन्यांनी एमएस धोनीला पहिली वनडे खेळण्याची संधी मिळाली होती.


अनुभव आणि वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये तणावाच्या क्षणी शांत आणि संयमी राहण्याच्या खुबीमुळे दिनेश कार्तिक हा ऋषभ पंतपेक्षा उजवा ठरला. ऋषभ पंतकडे एक्स-फॅक्टर आहे, तसंच आपल्या आक्रमक खेळीमुळे पंत एकहाती मॅच फिरवू शकतो, पण पंतसारख्या युवा खेळाडूला एवढ्या मोठ्या स्पर्धेत उतरवण्यापेक्षा अनुभवी दिनेश कार्तिकला निवड समिती आणि विराट कोहलीने प्राधान्य दिल्याचं बोललं जात आहे.


निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद पत्रकार परिषदेत म्हणाले की, 'दिनेश कार्तिकला पंतपेक्षा विकेट कीपिंगचा जास्त अनुभव आहे. त्यामुळे ऋषभ पंतऐवजी कार्तिकला प्राधान्य देण्यात आलं. बॅटिंगबरोबरच विकेट किपिंग देखील फार महत्त्वाचं आहे. या कारणामुळे आम्ही टीममध्ये दिनेश कार्तिकला संधी दिली, अन्यथा पंतला देखील संधी मिळाली असती'.


अशी आहे भारतीय टीम


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, केएल राहुल, विजय शंकर