मुंबई : गेली ४६ दिवस इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट महोत्सवाची अखेर सांगता झाली. लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर एका नव्या विश्वविजयी संघाचा उदय झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर सांगता झाली. या विश्वचषकानं जगाला एक नवा विश्वविजेता दिला. या खेरीज इतर काही घटनांसाठीही हा विश्वचषक क्रिकेटप्रेमींच्या कायम लक्षात राहिलं. या स्पर्धेत खलनायक ठरलेला पाऊस, धोनीच्या ग्लोव्हजवरुन उठलेलं वादंग, पंचांचे वादग्रस्त निर्णय, काही धक्कादायक निकाल, काही विक्रम, स्पर्धे दरम्यानची सुरक्षितता अशा काही घटना क्रिकेप्रेमींच्या कायम स्मरणात राहतील.


संपूर्ण स्पर्धेत पावसानं खलनायकाची भूमिका पार पाडली. काही महत्त्वाच्या सामन्यांवर पावसामुळे पाणी फेरलं गेलं. पावसाचा फटका भारताला तर सर्वाधिक बसला. पावसामुळेच एकप्रकारे भारताचं विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं.


दुखापतींचा विळखा


या विश्वचषकात जवळपास सर्वच संघांना दुखापतींचा चांगलाच फटका बसला. अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेलाच मुकावं लागलं. दुखापतींमुळे तर भारतीय संघाचं सगळं समीकरणच बिघडलं आणि त्याची परिणती पराभवात झाली.


पंचांचे वादग्रस्त निर्णय


या विश्वचषकात पंचाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावेत एवढे वादग्रस्त निर्णय देण्यात आले. विश्वचषकासारख्या स्पर्धेला साजेशी कामगिरी काही पंचांचा झाली नाही. पंचाच्या काही निर्णयामुळे क्रिकेटचाहते चांगलेच नाराज झाले.


धोनीचे ग्लोव्हज


महेंद्रसिंग धोनीनं पहिल्याच सामन्यात पॅरा एसएफच्या बलिदान या चिन्हाशी साधर्म्य साधणारं चिन्हं आपल्या ग्लोव्जवर लावलं आणि एकच वाद सुरु झाला. आयसीसीनं यावर आक्षेप नोंदवत धोनीला ग्लोव्जवरुन हे चिन्ह हटवण्याचे आदेश दिले. या आक्षेपावरुन भारतीय क्रिकेट चाहत्यांनी आयसीसीवर चांगलंच तोंडसुख घेतलं.


धक्कादायक निकाल


स्पर्धेत काही धक्कादायक निकालांची नोंद झाली. बांग्लादेशनं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद केली. अफगाणिस्ताननं भारतासारख्या संघाला विजयासाठी झुंजवलं. तर श्रीलंकेनं इंग्लंडला पराभूत केलं.


विक्रमांची नोंद


स्पर्धेत रोहित शर्मानं पाच शतकं ठोकत नव्या विश्वविक्रमाची नोंद केली. विश्वचषकातील एका स्पर्धेत सर्वाधिक ५ शतकं ठोकण्याचा विक्रम त्यानं केलाय. विश्वचषकात सर्वाधिक १७ षटकार खेचण्याचा विक्रम इंग्लंडच्या ईयॉन मॉर्गननं केला. तर मोहम्मद शमी आणि ट्रेंट बोल्टनं विश्वचषकात हॅटट्रिकची नोंद केली.  


दक्षिण आफ्रिकेची वाताहत


दक्षिण आफ्रिका संघांची आतापर्यंत झाली नव्हती एवढी खराब कामगिरी झाली. दुखापतींचा विळखा बसलेल्या या संघाला पहिल्याच सामन्यात बांग्लादेशनं पराभवाची धूळ चारली. या पहिल्याच धक्क्यातून त्यांना काही सावारताच आलं नाही.


स्पर्धेतील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह


भारत-श्रीलंका सामना सुरु असताना स्टेडिमवरुन काश्मीरला न्याय द्या अशी बॅनरबाजी करणारं विमान उडालं. याखेरीज काही सामन्यांच्यावेळी बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवं आहे अशा आशयाचे फलक झळकावण्यात आले. एका सामन्यात स्टेडिममध्येच पाक आणि बलुचिस्तानच्या समर्थकांनी चांगलाच राडा केला. यावरुन आयोजकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.


२०१९ क्रिकेट विश्वचषकाची ही काही वैशिष्ट्य होती. जसा नव्या विश्वविजेत्या संघासाठी हा विश्वचषक स्मरणात राहिल. याचबरोबर या घटनांसाठीदेखील हा विश्वचषक कायम स्मरणात राहिलं.