`मी ऐश्वर्या रायशी लग्न केलं तर...`; अब्दुल रझाकच्या अभद्र वक्यव्यावर पाकच्या खेळाडूंनी कुटल्या टाळ्या
World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 आता अखेरच्या टप्प्यात आलेला असतानाच सेमीफायनलमध्ये पोहोचलेले संघ तयारीला लागले आहेत. पण, सध्या मात्र चर्चा होतेय ती म्हणजे पाकच्या संघातील माजी सदस्याची...
Pakistan Cricket Team : यंदाचा वर्ल्ड कप काही संघांना फळला तर, काही संघांना या वर्ल्ड कपमध्ये सातत्यानं पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानचा संघही यापैकीच एक. वर्ल्ड कपचं यंदाचं पर्व संघासाठी इतकं वाईट गेलं की आता सर्वच स्तरांतून पाकच्या क्रिकेट संघावर, कर्णधारावर आणि खेळाडूंच्या वाईट कामगिरीवर कडाडून टीका करण्यात येत आहे.
संघातील माजी खेळाडूसुद्धा असाच सूर आळवताना दिसत आहेत. किंबहुना अनेक माजी खेळाडूंच्या मते एकंदर कामगिरी आणि सातत्याचा अभाव पाहता बाबर आझमची आता संघाच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी करावी अशीच मागणीही करताना दिसत आहेत. पाकच्या संघावर निशाणा साधताना पाकचेच माजी खेळाडू सणसणीत टीका करतायत खरे, पण त्यांनी यादरम्यानच मर्यादा ओलांडली आणि एक उदाहरण देताना बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा उल्लेख एका विचित्र उदाहरणासाठी केला.
पाकचा माजी खेळाडू आणि ऑलराउंडर अब्दुल रज्जाक (Abdul Razzaq) यानं ऐश्वर्याबद्दल अभद्र कमेंट केली. पाकिस्तानच्या संघाकडून वर्ल्ड कपमधील कामगिबाबतचा आढावा घेत संघाची शाळाच माजी खेळाडूंनी एका कार्यक्रमादरम्यान घेतली. यामध्ये 2009 मधील टी20 वर्ल्ड कप संघातील खेळाडूंचा समावेश होता. शाहिद आफ्रिदी, युनूस खान, मिसबाह उल हक, उमर गुल, सईद अजमल, शोएब मलिक आणि कामरान अकमल या खेळाडूंची या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तितक्यातच रझाकनं उदाहरण देत ऐश्वर्याच्या नावाचा उल्लेख केला आणि सर्वांच्याच नजरा वळवल्या.
हे कसलं वक्तव्य....
पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर निशाणा साधत असतानाच रझाकनं ज्या उदाहरणासह आपलं म्हणमं पटवून दिलं ते अनेकांनाच पटलं नाही. पण, त्याच्या या वक्तव्यावर पाकच्या इतर खेळाडूंनी मात्र टाळ्या कुटल्या आणि अनेकांनाच धक्का बसला, काहींचा तर संताप अनावर झाला.
क्रिकेट नियामक मंडळाला विसारसरणीच बदलावी लागेल असं एकंदर वक्तव्य पटवून देताना रझाक म्हणाला, 'मी त्यांच्या (पीसीबी) मनसुब्यांविषयी बोलतोय. मी पाकसाठी खेळत होतो तेव्हा मला ठाऊक होतं की माझ्या कर्णधाराची संघाप्रती असणारी ध्येय्य प्रामाणिक होती. त्यातूनच मला आत्मवि्वास आणि धाडस मिळालं आणि अल्लाहच्या मेहेरबानीनं मी चांगलं प्रदर्शन केलं'.
हेसुद्धा वाचा : 'मी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये...'; सेमी-फायलनमध्ये हारण्याच्या भीतीसंदर्भात रिचर्ड्सन यांचा सल्ला
विचारसरणीविषयी बोलताना इतक्यावरच न थांबता पुढं तो म्हणाला, 'आता तुम्ही असा विचार करताय की मी ऐश्वर्या रायशी लग्न करेन आणि त्यातून जन्मलेलं आमचं मूल सुसंस्कृत आणि प्रामाणिक असेल तर असं कधीच होणार नाही. थोडक्यात आधी स्वत: प्रामाणिक राहा तरच संघाचं प्रदर्शन समाधानकारक राहील.' रझाकनं हे उदाहरण देताच त्याच्या बाजुला असणाऱ्या आफ्रिदी आणि मिसबाहनं टाळ्या वाजवल्या आणि या विचित्र प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. नेटकऱ्यांना पाकच्या खेळाडूंचा हा अंदाज रुचला नाही, ज्यामुळं आता त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.