Wasim Akram Slams Babar Azam Team: वर्ल्ड कपच्या 22 व्या सामन्यामध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानचा अनपेक्षितपणे धुव्वा उडवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाला अफगाणिस्तानने 8 विकेट्स राखून पराभूत केलं. पाकिस्तानची पराभवाची नकोशी हॅटट्रीक या सामन्यामुळे पूर्ण झाली आहे. यापूर्वी पाकिस्तानला ऑस्ट्रेलिया आणि भारताने पराभूत केलं आहे. पाकिस्तानच्या पराभवासाठी बाबर आझमने गोलंदाजांना दोष दिला असला तरी पाकिस्तानचं क्षेत्ररक्षण या स्पर्धेत फारसं चांगलं राहिलेलं नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही पाकिस्तानच्या खराब क्षेत्ररक्षणाची झलक पाहायला मिळाली. आपल्या पहिल्या 5 सामन्यांमध्ये पाकिस्तानने अनेक कॅच सोडले. अनेकदा अगदी सहज आडवता येतील असे चौकारही पाकिस्तानी खेळाडूंना रोखता आले नाहीत. यावरुनच पाकिस्तानच्या एका माजी कर्णधाराने थेट पाकिस्तानी क्रिकेटपटूंचं खाणं काढलं असून कठोर शब्दांमध्ये बाबरच्या नेतृत्वाखालील संघावर टीका केली आहे.


रोज 8-8 किलो मटण खातात, तरी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार वसीम अक्रमने पाकिस्तानला अफगाणिस्तानने पराभूत केल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. 'ए स्पोर्ट्स'वरील एका कार्यक्रमामध्ये बोलताना वसीम अक्रमने, "आजचा दिवस फारच वाईट होता. 280 धावांपर्यंत ते (अफगाणिस्तान) केवळ 2 विकेट्स गमावून पोहचले. ही फार मोठी गोष्ट आहे," असं म्हणत अफगाणिस्तानच्या संघाचं कौतुक केलं आहे. पुढे बोलताना वसीम अक्रम यांनी पाकिस्तानी संघावर कठोर शब्दांमध्ये टीका केली. "तुम्ही यांची (पाकिस्तानची) फिल्डींग पाहा. मागील 3 आठवड्यांपासून असं वाटतं आहे की या खेळाडूंनी मागील 2 वर्षामध्ये एकदाही फिटनेस टेस्टला समोरे गेलेले नाहीत. मी यांची नावं घेऊन टीका केली तर शर्मेनं त्यांची मान खाली जाईल. हे खेळाडू रोज 8-8 किलो मटण खातात, तरी ते तंदरुस्त (फिट) नाहीत," अशा शब्दांमध्ये वसीम अक्रमने आपल्या संतापाला वाट मोकळी करुन दिली.


सगळ्यांना खेळायचा पैसा मिळतोय


"हे पाहा सर्व खेळाडूंना देशासाठी खेळल्याबद्दल पैसा मिळतो. मिस्बाह उल हक जेव्हा प्रशिक्षक होता तेव्हा कोणालाही तो आवडत नव्हता. मात्र त्याचा फिटनेससंदर्भातील क्रायटेरिया फारच उत्तम होता. त्याचा परिणाम मैदानावर दिसून यायचा. फिल्डींगसाठी उत्तम फिटनेस आवश्यक आहे. आपण तिथेच मार खात आहोत. आपण आहोत त्याच ठिकाणी आहोत," असंही पुढे बोलताना वसीम अक्रमने म्हटलं आहे.



अव्वल 4 मध्ये असण्याची शक्यता कमी


पाकिस्तानने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत फिल्डींगमध्ये सुमार कामगिरी केली आहे. अनेक धावबाद करण्याच्या संधी पाकिस्तानने सोडल्या. प्रत्येक सामन्यात पाकिस्तानने कॅच सोडले आहेत. पाकिस्तानच्या अशा कामगिरीमुळे ते अव्वल 4 मध्ये असतील की नाही याबद्दल आता शंका उपस्थित केली जात आहे.