ICC World Cup 2023 Australia vs South Africa: एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया संघाच्या कामिगरीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारतानंतर दक्षिण आफ्रिकेनेही ऑस्ट्रेलियाचा लाजिरवाणा पराभव केला आहे. दक्षिण आफ्रिकेने तब्बल 134 धावांनी ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. वर्ल्डकपचा दावेदार मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या सलग दोन पराभवांमुळे क्रिकेट समीक्षकांसह क्रिकेट चाहतेही आश्चर्य व्यक्त करत आहेत. ऑस्ट्रेलियाच्याा अनेक माजी खेळाडूंनी यावरुन ऑस्ट्रेलिया संघाला खडे बोल सुनावले आहेत. दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरोधातील सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या नावे एका लाजिवणाऱ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. तब्बल 40 वर्षात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियावर ही स्थिती ओढवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिली फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 7 विकेट गमावत 311 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघ 40 षटकात ऑल आऊट झाला. ऑस्ट्रेलिया संघ केवळ 177 धावा करु शकला. ऑस्ट्रेलियाला तब्बल 134 धावांनी पराभव स्विकारावा लागला. वर्ल्डकपच्या इतिहासातील ऑस्ट्रेलियाचा हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. याआधी पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा मोठा पराभव केला होता. 


40 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं


ऑस्ट्रेलिया संघ 311 धावांचा पाठलाग करताना फलंदाजीसाठी मैदानात उतरला असता आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. फक्त 65 धावांमध्ये ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ गारद झाला होता. 16.1 ओव्हरमध्ये फक्त 65 धावांमध्ये ऑस्ट्रेलियाचे 5 गडी तंबूत परतले होते. वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने इतकी खराब कामगिरी गेल्या 40 वर्षात केली नव्हती. वर्ल्डकपच्या कोणत्याही सामन्यात 40 वर्षात ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच 70 धावांच्या आत 5 विकेट गमावले. या पाच फलंदाजांपैकी एकही फलंदाज 20 पेक्षा जास्त धावा करु शकला नाही. 


वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच सलग 4 सामन्यांमध्ये पराभव


या पराभवासह ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच वर्ल्डकप स्पर्धेत सलग 4 सामने गमावले आहेत. वर्ल्डकपच्या इतिहासात आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं. 2019 च्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिक आणि इंग्डंलसह झालेले शेवटचे 2 सामने गमावले होते. यानंतर आता झालेले पहिले दोन्ही सामनेही गमावत सलग 4 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. 


मॅथ्यू हेडनचा संताप


ऑस्ट्रेलियाच्या खराब कामगिरीवर ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडन चांगलाच संतापला आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधातील पराभवावर बोलताना त्याने संघ आपली शिकार होण्याची वाट पाहत आहे अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे. "मी जेव्हा कधी शेन वॉर्नचा विचार करतो तेव्हा तो नेहमी विकेट घेण्याचा प्रयत्न करायचा हेच डोक्यात येतं," असं मॅथ्यू हेडनने म्हटलं आहे.