एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धात भारतीय संघ आता तुलनेने दुबळ्या बांगलादेशशी भिडणार आहे. भारताने पहिले तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले असल्याने यापुढील सामन्यातही तशाच कामगिरीची अपेक्षा आहे. दुसरीकडे भारताविरोध सामना असल्याने नेहमीप्रमाणे बांगलादेशचे क्रिकेट चाहते आक्रमक झाले असून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत. यादरम्यान बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल-हसनने विराट कोहलीचा उल्लेख केला आहे. सध्याच्या मॉर्डन काळातील विराट कोहली हा सर्वोत्तम फलंदाज असल्याचं कौतुक त्याने केलं आहे. गुरुवारी 19 ऑक्टोबरला भारत आणि बांगलादेश संघ पुण्यात भिडणार आहे. एमसीए मैदानात हा सामना होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीसोबतच्या आपल्या मैदानावरील स्पर्धेवर बोलताना शाकीब अल-हसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही फॉरमॅटमध्ये मी त्याला आऊट करु शकलो याचा आनंद असल्याचं म्हटलं आहे. शाकीब अल-हसनने 23 सामन्यांमध्ये 6 वेळा विराट कोहलीची विकेट काढली आहे. एकदिवसीय प्रकारात 14 सामन्यांमध्ये त्याने 5 वेळा विराटला तंबूत धाडलं आहे. 


"तो एक विशेष फलंदाज आहे. मॉडर्न युगातील कदाचित सर्वोत्तम फलंदाज. मी त्याला 5 वेळा आऊट करु शकलो हे माझं भाग्य आहे. त्याची विकेट मिळवण्याचा आनंद वेगळाच असतो," असं शाकीब अल-हसनने स्टार स्पोर्टशी बोलताना सांगितलं. 


विराट कोहलीनेही शाकीब अल-हसनचं कौतुक केलं आहे. तो एक धोकादायक गोलंदाज असल्याचं त्याने सांगितलं आहे. जगातील सर्वोत्तम फलंदाजांना आपल्या तालावर नाचवण्याचं कौशल्य त्याच्याकडे आहे असं विराटने म्हटलं आहे. 


"मी गेली अनेक वर्षं त्याच्याविरोधात खेळलो आहे. त्याच्याकडे जबरदस्त नियंत्रण आहे. तो एक अनुभवी गोलंदाज आहे. नवीन चेंडूसह तो चांगली गोलंदाजी करतो. फलंदाजाला आपल्या जाळ्यात कसं अडकवायचं याची त्याला उत्तम जाण आहे. अशा गोलंदाजांविरोधात तुम्हाला तुमची सर्वोत्तम खेळी करावी लागते. आणि जर तुम्ही खेळू शकला नाहीत तर हे गोलंदाज मोठा दबाव निर्माण करु शकतात आणि तुम्ही बाद होण्याची शक्यता वाढते," असं विराटने सांगितलं आहे.


न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शाकिबला दुखापत झाली होती. पण भारताविरोधातील लढतीपूर्वी बांगलादेशवा थोडा दिलासा देत तो नेटमध्ये परतला आहे. दुसरीकडे, कोहलीने आधीच दोन अर्धशतके ठोकली असून चांगल्या स्थितीत आहे. त्यामुळे त्यांच्यातील हे युद्ध पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.