सामना सुरु असतानाच हैदराबादच्या मैदानात नमाज पठण केल्याने रिझवान अडचणीत; आता ICC...
Muhammed Rizwan Namaz In Ground: मोहम्मद रिझवान पुन्हा अडचणीत आला असून भारतात सुरु असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान केलेल्या एका कृतीमुळे त्याच्यावर कारवाईची शक्यता आहे.
Muhammed Rizwan Namaz In Ground: भारतामध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या पाकिस्तान विरुद्ध भारत सामन्यातील हुल्लडबाजीचं प्रकरण थेट अंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीपर्यंत गेलं. पाकिस्तानचा विकेटकीपर मोहम्मद रिझवान बाद झाल्यानंतर पव्हेलियनमध्ये परत जात असतानाही काही प्रेक्षकांनी धार्मिक शेरेबाजी केल्याचा आरोप पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केला आहे. याच प्रकरणामध्ये पाकिस्तानी संघाबरोबर भारतात दुजाभाव झाल्याची तक्रार पाकिस्तानने आयसीसीकडे केली आहे. मात्र या प्रकरणामध्ये वर्णभेदी किंवा द्वेष निर्माण करणारी विधानं, कृती करणाऱ्यांविरोधातील कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच नियम हे व्यक्तींसाठी असून चाहत्यांच्या गटांवर कारवाई करता येणार नाही असं आयसीसीच्या माजी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. एकीकडे हे प्रकरण चर्चेत असतानाच दुसरीकडे मोहम्मद रिझवान भारतात येऊन कायद्याच्या एका मोठ्या प्रकरणात अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिली करणारे अॅड. विनित जिंदाल यांनी अंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीकडे पाकिस्तानी विकेटकीपर असलेल्या मोहम्मद रिझवानविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. हैदराबादमध्ये वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात आलेल्या पाकिस्तान आणि नेदरलॅण्डविरुद्धच्या सामन्यादरम्यानच्या ब्रेकमध्ये मोहम्मद रिझवानने मैदानातच नमाझ पठण केलं होतं. जिंदाल यांनी केलेल्या तक्रारीमध्ये मोहम्मद रिझवानने सर्व प्रेक्षकांसमोर आणि प्रामुख्याने भारतीय प्रेक्षकांसमोर आपल्या धर्मातील धार्मिक कृती करुन खेळभावनेच्या विरोधात कृत्य केल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी खेळाचे नियम मोडल्याच्या नियमांअंतर्गत मोहम्मद रिझवानविरोधात कठोर कारवाई करवाई असं जिंदाल यांनी म्हटलं आहे. आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून जिंदाल यांनी तक्रार नोंदवली आहे.
गाझासंदर्भात केलेली पोस्ट
पाकिस्तान आणि श्रीलंकेदरम्यान 10 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात आलेल्या सामन्यात 345 धावांचा पाठलाग पाकिस्तानने यशस्वीपणे केला. 6 विकेट्स आणि 10 चेंडू शिल्लक असतानाच पाकिस्तानने 345 धावा करत सामना खिशात घातला. या सामन्यात मोहम्मद रिझवान 131 धावा करुन नाबाद राहिला. सामना जिंकल्यानंतर मोहम्मद रिझवानने, "हा विजय गाझामधील बंधू-भगिनींसाठी समर्पित करतो," असं ट्वीट केलं होतं. यावरुनही अनेकांनी मोहम्मद रिझवानवर टीका केली होती. रिझवानच्या या ट्वीटनंतर अनेकांनी आयसीसीने केवळ भारतीय लष्कराचं निशाण असलेल्या महेंद्र सिंग धोनीच्या ग्लोव्हजवरुन घातलेल्या गोंधळाचीही सोशल मीडियावर आठवण करुन दिली.
भारताविरुद्ध ठरला फ्लॉप
भारताविरुद्ध मोहम्मद रिझवनला अर्धशतकही झळकावता आलं नाही. संघाला मोहम्मद रिझवानच्या चांगल्या खेळीची गरज असतानाच रिझवानला 49 धावांवर जसप्रीत बुमराहने क्लिन बोल्ड केलं.